* वर्षभरात रस्त्यांवर  ३ हजार कोटी खर्च होणार
* खासगी मालमत्तांचीही  पालिका सफाई करणार
मुंबई महापालिकेचा २०१४-१५ या आर्थिक वर्षांसाठी पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी सुमारे ३१ हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प तयार केला असून बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत तो सादर करण्यात येणार आहे. निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर नव्या कराचा भार मतदारांवर टाकण्यात आलेला नसला तरी पुढील वर्षी पाणीपट्टीतील सरासरी आठ टक्के दरवाढीला मुंबईकरांना सामोरे जावे लागणार आहे.
कुंटे यांनी २०१३-१४ चा २७ हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला होता. या अर्थसंकल्पात तरतूद केलेली ८० टक्के रक्कम प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे खर्चच होऊ शकलेली नाही. आता २०१४-१५ चा अर्थसंकल्प ३१ हजार कोटी रुपयांचा आहे. पावसाळ्यात साफ धुतल्या गेलेले रस्ते गुळगळीत करण्यासाठी सुमारे ३ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. व्यावसायिकांना महापालिकेत परवाना मिळविण्यासाठी, तसेच त्याचे नूतनीकरण करण्यासाठी खेटे घालावे लागतात. हा त्रास दूर करण्यासाठी अर्थसंकल्पाचे निमित्त साधून स्वतंत्र ‘व्यवसाय कक्ष’ (बिझनेस सेल) सुरू करण्यात येणार आहे. या कक्षाच्या माध्यमातून व्यावसायिकांना सुलभरित्या परवाने मिळू शकतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी विशेष योजनाही राबविण्याचा पालिकेचा मानस असून त्यासाठी १५ कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात येणार आहे. या अर्थसंकल्पात पालिकेने संपूर्ण मुंबईच्या स्वच्छतेचा संकल्प सोडला आहे. खासगी मालमत्तांमधील साफसफाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठीही निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्याचबरोबर आरोग्य विभागाने हाती घेतलेले प्रकल्प तडीस नेण्यासाठी, तसेच मुंबईकरांच्या आरोग्यासाठीही मोठा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे.लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे प्रतिबिंब पालिकेच्या अर्थसंकल्पावर पडले असून शिवसेना-भाजप युतीने विशेष तरतूद करीत महिला आणि व्यावसायिकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे.