डोंबिवली ते ठाणे अंतर वाहनाने कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या माणकोली उड्डाण पुलाच्या संलग्न रस्त्यासाठी जमीन उपलब्ध करून देण्याची मागणी ‘मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा’ने कल्याण-डोंबिवली पालिकेकडे दीड वर्षांपूर्वी केली आहे. प्राधिकरणाच्या या पत्रावर पालिका प्रशासनाने कोणतीही कार्यवाही न केल्याने ‘एमएमआरडीए’चे मुख्य अभियंता स. भ. तामसेकर यांनी पालिका आयुक्तांना स्मरणपत्र पाठवून रस्त्यासाठी भूसंपादन करण्याचे सुचवले आहे. भूसंपादनाचा हा गोंधळ कमी पडतो की काय; म्हणून पालिकेच्या सर्वसाधारण सभेत माणकोली पुलाच्या संलग्न रस्त्यासाठी भूसंपादन करण्याचा विषय मंजुरीसाठी प्रशासनाने ठेवला होता. या वेळी हा विषय मंजूर करण्याऐवजी नगरसेवकांनी ‘या जागेची पाहणी करायची आहे’ अशी ‘पाचर’ मारून हा महत्त्वाचा विषय स्थगित ठेवण्यात धन्यता मानली.
माणकोली उड्डाण पुलाच्या कामाची निविदा प्रक्रिया ‘एमएमआरडीए’ने सुरू केली आहे. हे काम त्वरित मार्गी लागण्यासाठी पालिकेने या कामासाठी हद्दीतील पोहोच रस्त्यासाठी जागा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. ‘एमएमआरडीए’च्या कार्यकारी अभियंत्याने मार्च २०१३ मध्ये पालिकेला पत्र पाठवून माणकोली उड्डाण पुलाच्या ४५ मीटर रुंदीच्या पोहोच रस्त्यासाठी जमीन भूसंपादन करून देण्याची मागणी केली आहे. न्
ोहमीच गतिमान, तत्पर आणि पारदर्शकतेचे गोडवे गाणाऱ्या पालिका अधिकाऱ्यांनी प्राधिकरणाच्या पत्रांना केराची टोपली दाखवली. त्यामुळे ‘एमएमआरडीए’चे मुख्य अभियंता स. भ. तामसेकर यांनी तीन महिन्यांपूर्वी पालिका आयुक्तांना पत्र लिहून पुलाच्या पोहोच रस्त्यासाठी जमीन भूसंपादनाचा प्रस्ताव सादर केला आहे. त्याची कार्यवाही झाली नसल्याचे कळवले आहे. या पत्रानंतर पालिकेने या कामाचे सर्वेक्षण केले. ‘जूनमध्ये झालेल्या बैठकीत मोठागाव-माणकोली दरम्यान सहा पदरी उड्डाण पूल बांधण्याचे ठरले आहे. पुलाची निविदा प्रक्रिया सुरू केली आहे.
तीन महिन्यांत हे काम सुरू करण्याचा मानस असल्याचे तामसेकर यांनी पत्रात म्हटले आहे. या महिन्याच्या अखेपर्यंत या पुलाची निविदा प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे. पालिका प्रशासनाने गेल्या महिन्यातील महासभेत या पुलासाठी ४५ मीटर रस्त्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव महासभेत मंजुरीला आणला होता. नेहमीच स्वार्थासाठीचे विषय तातडीने ‘मंजूर आणि अंमलबजावणी’साठी तत्पर असलेल्या महापौरांसह, नगरसेवकांनी या विषयाला मंजुरी देण्याऐवजी या रस्ते भागाची पाहणी करण्याची मागणी करून हा विषय स्थगित ठेवण्यात
धन्यता मानली.
पाहणी करायची आहे -टेंगळे
पालिकेचे भूसंपादन विभागाचे नगररचनाकार सुरेंद्रनाथ टेंगळे यांनी सांगितले, पालिकेच्या महासभेत हा विषय चर्चेला आला होता. ज्या भागातून रस्ता जाणार आहे त्या भागाची पालिका पदाधिकाऱ्यांकडून पाहणी करण्यात येणार आहे. त्यानंतर या विषयावर निर्णय घेण्यात येणार आहे. ‘एमएमआरडीए’च्या अधिकाऱ्यांनी पोहोच रस्ता भूसंपादन कामासाठी पालिकेशी दीड वर्षांपूर्वी पत्रव्यवहार केला आहे. अद्याप त्यांच्याकडून सकारात्मक उत्तर आले नसल्याचे सांगितले.  
अस्तित्वात रस्त्याची पाश्र्वभूमी
डोंबिवली पश्चिमेतील मोठागाव ते रेतीबंदर भागातून (गणपती विसर्जन रस्ता) १९९७ मध्ये ३२५ मीटर पैकी २२० मीटर लांबीचा १५ मीटर रुंद रस्ता खाडी किनाऱ्यापर्यंत पालिकेने यापूर्वीच केला आहे. हा रस्ता दोन्ही बाजूने वाढवून ४५ मीटर रुंद केल्यास मोठागाव भागातील सहा जणांच्या जमिनी बाधित होतात. तसेच, पालिकेच्या सहा आरक्षित भूखंडांमधील एकूण २ लाख ७३ हजार ६०० चौरस मीटर क्षेत्रापैकी ७ हजार १०० चौ. मी. जागा रस्ते कामासाठी बाधित होणार आहे. या रस्त्याचा बाह्य़ वळण (रिंगरूट) रस्त्यासाठी उपयोग होणार असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे.
का रखडवला विषय?
मोठागाव भागात एका राजकीय नेत्याची १६ एकर जमीन आहे. हे क्षेत्र ‘सीआरझेड’ने बाधित आहे. हे क्षेत्र ‘सीआरझेड’मधून मुक्त करण्यासाठी काही हालचाली या पुलाच्या माध्यमातून करता येतील का असा एक डाव शिजत आहे. सरसकट हा विषय मंजूर केला तर या राजकीय नेत्याची नाराजी अनेकांना परवडणार नाही. पालिकेत आणि मोठागाव भागात या मंडळींचे वजन आहे. रस्ता रुंदीकरण करताना काही नागरिक विस्थापित होणार आहेत. या भागात अनधिकृत चाळींचे पेव फुटले आहे. त्यांचे काय करणार असे प्रश्न उपस्थित करून हा विषय चिघळवत ठेवून १६ एकरचा तिढा सोडवण्याच्या काही मंडळींच्या हालचाली असल्याचे बोलले जाते. कोपर येथील क्षेपणभूमीसाठी राखीव जागा भागातील सीआरझेडचा तिढा गुपचूप सोडवण्यात काही मंडळी यशस्वी झाली असल्याचे बोलले जाते. तसाच हा तिढा सोडवण्याच्या हालचाली सुरू असल्याचे समजते.