काँग्रेसने सर्वसामान्य जनतेचा वापर केवळ सत्ता भोगण्यासाठीच केला आहे. तरी मनसेच्या कार्यकर्त्यांनी प्रवाहाच्या विरोधात लढण्याची हिंमत करावी. सर्वसामन्यांचा पक्ष म्हणून मनसेकडून जनतेच्या अपेक्षा असल्याने त्यांच्या पूर्ततेसाठी ‘गाव तिथे शाखा आणि घर तेथे राजसैनिक’ ही मोहीम कार्यकर्त्यांनी ताकदीने हाती घ्यावी असे आवाहन ‘मनसे’ चे आमदार वसंत गिते यांनी केले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्ता व पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते. पक्षाचे सरचिटणीस शिरीष पारकर, जिल्हा संपर्कप्रमुख सत्यवान दळवी, जिल्हाध्यक्ष अॅड. विकास पवार, रणजित भोसले, धर्यशील पाटील, महिला आघाडीच्या अध्यक्षा स्वाती शिंदे, रवींद्र शेलार, सुनील जाधव, महेश जगताप, सागर बर्गे यांची उपस्थिती होती.
वसंत गिते म्हणाले की, दोन्ही काँग्रेसकडे शिक्षण संस्था, कारखाने असल्याने स्वत:ची जहागिरी असल्यासारखे ते वागत आहेत. त्यांना जनता त्रासली असून, जनतेला परिवर्तन हवे आहे. ते घडविण्यासाठी मनसेच्या कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. दोन्ही काँग्रेसच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडकीस येत असल्याने जनतेला हवा असलेला पर्याय मनसे देऊ शकतो असा विश्वास त्यांनी दिला.
शिरीष पारकर म्हणाले की, दादागिरीच्या राजकारणाविरोधात आवाज उठवण्यासाठी मनसेच्या कार्यकर्त्यांची एकजूट होणे गरजेचे आहे. दोन्ही काँग्रेस जनतेचे हित पाहात नाहीत. त्यास विरोधी पक्ष असलेले शिवसेना व भाजप विरोध करायचा सोडून दोन्ही काँग्रेसच्या सुरात सूर मिळवत आहेत. त्यासाठी जनतेला ‘मनसे’ हाच एकमेव पर्याय आहे तरी, कार्यकर्त्यांनी कामाला लागावे.  
प्रास्ताविकात अॅड. विकास पवार यांनी मनसेने राबवलेल्या उपक्रमांची माहिती दिली.  सत्यवान दळवी, स्वाती शिंदे, रवींद्र शेलार यांची भाषणे झाली. सागर बर्गे यांनी सूत्रसंचालन केले. राजू केंजळे यांनी आभार मानले.