06 August 2020

News Flash

शिस्त बद्ध गर्दी

कमळपुष्पांकित भगवे-हिरवे ध्वज खांद्यावर घेऊन, भगव्या टोप्या, मफलर, परिटघडीचे पांढरेशुभ्र कुर्तेपायजमे परिधान करून, वर ‘मोदीजॅकेट’ मिरवित भाजपचे हजारो कार्यकर्ते, चाहते

| November 1, 2014 01:30 am

कमळपुष्पांकित भगवे-हिरवे ध्वज खांद्यावर घेऊन, भगव्या टोप्या, मफलर, परिटघडीचे पांढरेशुभ्र कुर्तेपायजमे परिधान करून, वर ‘मोदीजॅकेट’ मिरवित भाजपचे हजारो कार्यकर्ते, चाहते आणि शुभचिंतक झुंडीच्या झुंडीने शिस्तबद्ध पद्धतीने शपथविधी सोहळा ‘याचि देही याचि डोळा’ पाहण्यासाठी, डोळ्यात साठवून घेण्यासाठी दुपारपासूनच ओतत होते. चर्चगेट स्थानकाचा सगळा परिसरच भाजपामय बनला होता, चैतन्याने रसरसला होता.
एरवी राजकीय कार्यक्रम म्हणजे गोंधळ आणि गडबड असते. परंतु दुपारपासून येऊ लागलेले कार्यकर्ते शिस्तीत आणि रांगेत स्टेडियममध्ये प्रवेश करत होते. कार्यकर्त्यांच्या या गर्दीमध्ये महिलांची संख्याही लक्षणीय होती. तरुणपणी हिरीरीने जनसंघाचे काम करणाऱ्या, पण आता वार्धक्यामुळे थकलेल्या अनेक महिला हा सोहळा पाहण्यासाठी आवर्जून उपस्थित राहिल्या होत्या. काही महिला भगव्या साडय़ा परिधान करून हा विजयोत्सव साजरा करण्यासाठी आल्या होत्या. नागपूरवासीयही मोठय़ा संख्येने या सोहळ्यानिमित्त मुंबईत दाखल झाले होते.
प्रवेशपत्रिकेवर नमुद केलेल्या प्रवेशद्वारातूनच कार्यकर्त्यांना प्रवेश दिला जात होता. त्यामुळे काही कार्यकर्त्यांना प्रवेशद्वार शोधण्यासाठी चांगलीच पायपीट करावी लागत होती. मात्र तळपत्या उन्हात पायपीट करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर उत्साह ओसंडून वाहात होता. प्रवेशद्वारापर्यंत पोहोचल्यानंतर येथून आपल्याला प्रवेश मिळू शकणार नाही हे समजल्यानंतरही कोणताही संताप व्यक्त न करता कार्यकर्ते पोलिसांच्या मदतीने नियोजित प्रवेशद्वारपत पोहोचण्याचा प्रयत्न करीत होते. मध्येच पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या नावाचा गजर करीत कार्यकर्ते वातावरण भाजपमय करून टाकत होते.
मोठय़ा संख्येने येणाऱ्या कार्यकर्त्यांना उन्हाच्या झळा बसू नयेत यासाठी कमळाची प्रतीमा असलेल्या भगव्या टोप्यांचे विनामूल्य वाटप सुरू होते. भाजपचे छोटे ध्वज हाती फडकवत कार्यकर्ते पुढे सरकत होते. या परिसरात होणारी गर्दी लक्षात घेऊन महापालिकेकडून फिरत्या शौचालयांची व्यवस्था करण्यात आली होती.
शिस्तीमुळे वाहतूक सुरळीत
शपथविधी सोहळा यथासांग पार पडावा यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. नेताजी सुभाषचंद्र बोस मार्गावरील वाहतुकीवर कोणताही परिणाम होऊ नये याची पोलीस काळजी घेत होते. या मार्गावर मरिन ड्राईव्ह ते चर्चगेट परिसरात वाहने उभी करण्यास मज्जाव करण्यात आला होता. गाडय़ा भरून भाजप कार्यकर्ते येथे येत होते. परंतु ही वाहनेही येथे उभी करण्यास परवानगी नाकारण्यात येत होती. त्यामुळे या मार्गातील वाहतूक सुरळीतपणे सुरू होती.
मरिन ड्राईव्हची हॉटेल फाऊसफुल्ल
वानखेडे स्टेडिअममध्ये शपथविधी सोहळा होणार असल्याने मुंबईबाहेरचे भाजप पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी जवळपासच्या हॉटेलमध्ये उतरणे पसंत केले होते. त्यामुळे मरिन ड्राईव्हच्या समुद्रकिनाऱ्यालगतची आणि आसपासची हॉटेले गेल्या दोन दिवसांपासूनच फुल्ल झाली होती. शपथविधी सोहळ्याची वेळ जवळ येताच या हॉटेल्समधून बाहेर पडून पदाधिकारी-कार्यकर्ते मोठय़ा संख्येने वानखेडे स्टेडिअमच्या दिशेने जाताना दिसत होते.
प्रदेश कार्यालयातही गर्दी
शपथविधी सोहळ्याच्या प्रवेशपत्रिका मिळविण्यासाठी भाजप मुख्यालयात शुक्रवारी सकाळपासूनच राज्यभरातून आलेल्या कार्यकर्त्यांची धडपड सुरू होती. प्रवेशपत्रिका मिळणाऱ्या भाग्यवंतांचे चेहरे उजळत होते तर अद्याप न मिळालेले प्रतीक्षेत कार्यालयाबाहेर खोळंबत होते. या गर्दीमध्ये चर्चा सुरू होती ती शिवसेनेचे काय होणार याची.
आजवर भाजपाला दुय्यम स्थान देणाऱ्या शिवसेनेवर हे कार्यकर्ते टीकेचे आसूड ओढत होते. महापालिकांमध्ये भाजप नगरसेवकांच्या होणाऱ्या गळचेपीलाही चर्चेतून वाचा फुटत होती. आजवरच्या अपमानाचे उट्टे दामदुपटीने काढण्याची संधी चालून आल्याचा सूर कार्यकर्त्यांमध्ये उमटत होता. मात्र ठाकरे कुटुंबियांबद्दल जिव्हाळा असलेल्या काही कार्यकर्त्यांमध्ये शिवसेनेतील ‘बडव्यां’बद्दल तीव्र नापसंती व्यक्त करण्यात येत होती.
विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेने मराठी-गुजराती वादाला तोंड फोडून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण भाजप मुख्यालयासमोर जमलेल्या कार्यकर्त्यांच्या गर्दीत मराठी टक्काच अधिक दिसत होता. गावागावातून मराठी कार्यकर्ते आले होते. आता ही मराठी कार्यकर्त्यांची फौज शिवसेनेला दिसत नाही का, अशी प्रतिक्रिया भाजप कार्यकर्त्यांमध्ये उमटत होती. शिवसेना सोबत आली तर ठिक, नाहीतर आम्ही रामराज्य साकारण्यास समर्थ आहेत, असा टोलाही मारला जात होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 1, 2014 1:30 am

Web Title: crowd present on swearing in ceremony of devendra fadnavis shows discipline
टॅग Devendra Fadnavis
Next Stories
1 डेंग्यूला घाबरू नका..
2 पुन्हा उकाडा वाढणार
3 दुभाजकांमध्ये ‘पंक्चर’ कुठे तेही राजकारण्यांच्या मर्जीवर!
Just Now!
X