तब्बल हजार वर्षांपूर्वीच्या कलासंस्कृतीचा उत्तम नमुना असलेल्या अंबरनाथ येथील शिलाहारकालीन शिव मंदिरावरील शिळाशिल्पांची झपाटय़ाने झीज होत असून देखभाल दुरुस्तीअभावी हे प्राचीन वैभव नष्ट होण्याची भीती मंदिराच्या पुजाऱ्यांनी व्यक्त केली आहे. पुरातत्त्व खात्याने तातडीने मंदिर दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे. शिलाहारांनी बांधलेल्या बारा शिव मंदिरांपैकी सध्या फक्त अंबरनाथ येथील शिव मंदिर अस्तित्वात आहे. गेल्या श्रावण महिन्यात मंदिराचा ९५४ वा वर्धापन दिन साजरा झाला. जगभरातील सांस्कृतिक वारशांपैकी एक असलेली ही वास्तू भूमीज शैलीत बांधण्यात आली आहे. एकावर एक रचलेल्या शिल्पकृतींच्या सात रांगा (शिल्पगंगा) हे या मंदिराचे वैशिष्टय़ आहे. त्यातील दुसऱ्या आणि तिसऱ्या रांगेतील शिल्प आता पूर्णत: झिजले आहेत. तब्बल साडेनऊ शतके उन्हा-पावसात उभे असलेल्या या मंदिराचे दगडही ठिसूळ झाले आहेत. या शिल्पशिळा एकावर एक रचण्यात आल्याने एक जरी शिल्प ढासळले तरी मंदिराचा काही भाग कोसळण्याची शक्यता आहे. मंदिराचे पुजारी विजय पाटील यांना अशी तब्बल २५ धोकादायक शिल्पे आढळली आहेत. त्यातील काही शिल्पांना भेगा पडल्या असून काहींची झीज झाली आहे. त्यामुळे पुरातत्त्व खात्याने ही बाब गांभीर्याने घेऊन तातडीने दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.  मध्यंतरी राज्य शासनाने तीर्थक्षेत्र विकास निधी योजनेअंतर्गत कोटय़वधी रुपयांचा निधी मंदिर परिसर सुशोभीकरणासाठी उपलब्ध करून दिला. मात्र मंदिराच्या आवारात कोणतेही काम करण्यास पुरातत्त्व खात्याने परवानगी दिली नाही. त्यामुळे प्रवेशद्वारासारख्या ‘दिखाऊ’ योजनांवर तो पैसा खर्च करून सार्वजनिक बांधकाम खात्याने सुशोभीकरणाचा उपचार पूर्ण केला. मात्र प्रत्यक्षात मंदिरासाठी त्याचा काहीही उपयोग झाला नाही.