दुष्काळाच्या ऐनभरात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण उपाख्य ‘बाबा’ बुलढाणा जिल्ह्य़ाच्या दौऱ्यावर येऊन गेले. आता पावसाळा तोंडावर असतांना दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार उपाख्य ‘दादा’ येऊन गेले. मुख्यमंत्र्यांनी हवाई दौरा केला आणि ठोस असे काहीच दिले नाही. भुर्रकन आले आणि निघून गेले. राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला अशी त्यावेळची प्रतिक्रिया होती. आता उपमुख्यमंत्र्यांनी कारने दौरा केला. प्रत्यक्ष वस्तुस्थिती पाहिली, जाणून घेतली आणि दहा कोटीच्या अतिरिक्त निधीसह मंत्रालयात बैठक लावून ठोस उपाययोजनांचे अभिवचन दिले. राज्यभरात दादांवर कुठलेही आरोप होवोत मात्र, बुलढाणा जिल्ह्य़ाच्या दुष्काळाच्या संदर्भात मुख्यमंत्री बाबापेक्षा उपमुख्यमंत्री दादांनी ते प्रॅक्टीकल आणि अधिक कार्यप्रवण असल्याचे दाखवून दिले.
बुलढाणा जिल्हा भीषण दुष्काळ व तीव्र पाणीटंचाईच्या विळख्यात सापडला आहे. मार्चच्या दुसऱ्या आठवडय़ात जिल्ह्य़ाच्या दुष्काळावर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी मुख्यमंत्री जिल्ह्य़ाच्या मुख्यालयी आले. मुख्यमंत्री नियोजित वेळेपेक्षा तीन तास उशिरा बुलढाण्यात पोहोचले. आल्या आल्या दुष्काळ निवारण आढाव्याची विस्तृत बैठक घेण्याऐवजी सरळ जिल्हा कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष विजय अंभोरे यांच्या घरी ते गेले. तेथे त्यांनी सामिष भोजनावर यथेच्छ ताव मारला आणि नंतर घाईघाईने दुष्काळ निवारणाची आढावा बैठक पार पाडली. दुष्काळ व पाणीटंचाईग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी त्यांनी केली नाही. पत्रकारांशी बोलण्याचेही त्यांनी टाळले. त्यांच्या भेटीतून या जिल्ह्य़ासाठी उपाययोजनांचे कुठलेही ठोस पॅकेज मिळाले नाही. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांची बदली झाली. मात्र, दुष्काळ निवारणाचा फज्जा उडाला.  मात्र, आता दुष्काळाच्या चटक्यांनी लाहीलाही झालेल्या जिल्ह्य़ातील जनतेच्या जखमेवर फुंकर घालण्यासाठी उपमुख्यमंत्री येऊन गेले. औरंगाबादहूनच दादा  बुलेटप्रुफ कारने देऊळगावराजात पूर्वनियोजित वेळेपेक्षा अर्धा तास अगोदर आले. त्यामुळे अधिकाऱ्यांची एकच धांदल उडाली. दादांनी गिरोलीत चारा छावणीला भेट दिली. छावणीसाठी चारा आणि पैसा कमी पडू देणार नाही, गुरेढोरे छावणीत ठेवा, त्यांना हिरवा चारा व भरपूर पाणी द्या, पशुधन अजिबात विकू नका, असे त्यांनी कास्तकारांना निक्षून सांगितले. त्यानंतर त्यांनी उद्ध्वस्त झालेल्या फळबागांना भेट दिली. हेक्टरी ३० हजाराच्या मदतीचे ठोस आश्वासन दिले. तेथून चिखलीत भगीरथ जलसंजीवनी प्रकल्पाची पाहणी केली. नद्या व प्रकल्पांचे गाळ काढून करण्यात येणाऱ्या खोलीकरणाचे त्यांनी कौतूक केले. त्यानंतर त्यांनी जिल्हा परिषदेच्या शिवाजी सभागृहात चार तास सविस्तर आढावा बैठक घेतली. दुष्काळ निवारणाला बुस्टर डोज म्हणून दहा कोटी जाहीर केले. एकात्मिक पाणलोट, वसुंधरा पाणलोट व जलसंधारणाची कामे वर्षभर सुरू ठेवा, गाळ वाहून नेण्याची रॉयल्टी माफ, रोहयोच्या कुशल कामातून पाणंद रस्ता मजबुतीकरण व खडीकरण करा, असे आदेश अधिकाऱ्यांना दिले. बुलढाण्याच्या खडकपूर्णा पाणीपुरवठा योजनेचा लोकवर्गणीचा प्रश्न, जिल्हा बॅंकेचे पुनर्वसन, कर्जाचे पुनर्गठण, सिमेंट नाला बांधासाठी चाळीस कोटीच्या खर्चाला प्रशासकीय मंजुरी, शेतकऱ्यांना वेळेच्या आत राज्य बॅंक व राष्ट्रीयीकृत बॅंकेकडून कर्जवाटप, नांदुरा पाणी पुरवठा, खारपाणपट्टय़ातील जलसंधारणाच्या निकषाचे शिथिलीकरण यासाठी ते मंत्रालयात खासदार, आमदार व लोकप्रतिनिधींच्या स्वतंत्र बैठका घेऊन हे प्रश्न तातडीने सोडविणार आहेत.
दादांनी धडाडीचे व तडकाफडकीचे निर्णय घेत दुष्काळग्रस्तांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पत्रकारांशीही मनमोकळेपणाने व मनमुराद तासभर संवाद साधला.  आपण हायफाय नसून शिस्तीचे कडक व प्रक्टीकल आहोत, असे ठासून सांगत दुष्काळात जनतेला दिलासा देण्याचे काम करा अन्यथा, तुमची खर नाही, असा सज्जड दम अधिकाऱ्यांना देऊन जिल्ह्य़ाची प्रशासकीय यंत्रणा अधिक कार्यप्रवण केली. त्याचे दृश्य परिणाम लवकरच दिसतील. त्यामुळेच असे म्हणावे लागेल की, मुख्यमंत्री बाबांपेक्षा उपमुख्यमंत्री दादा अधिक प्रॅक्टीकल आहेत. आक्रमक, बेधडक, स्पष्टवक्ता असलेल्या उपमुख्यमंत्र्यांनी प्रशासकीय यंत्रणांची मरगळ दूर करून आश्वासनापेक्षा ठोस, असे काही देण्याचे अभिवचन तरी जिल्हावासीयांना दिले आहे.
जिल्हाधिकारी ते आणि हे
मुख्यमंत्री बाबांच्या भेटीच्या वेळी तत्कालिन जिल्हाधिकारी डॉ.बी.जी.वाघ कार्यक्षमता दाखवू शकले नाहीत. त्यामुळे त्यांना पदावरून हाकलले गेले. मात्र, उपमुख्यमंत्री दादांच्या भेटीच्या वेळी सध्याचे जिल्हाधिकारी किरण कुरूंदकर सज्ज होते. त्यांनी चांगले प्रेझेंटेंशन करून दादांकडून आपली पाठ थोपटून घेतली.