रात्री बाराचा ठोका पडताच टाळ-मृदुंगाचा गजर सुरू होतो. हरिनामाच्या जयघोषात लोक नववर्षांचे स्वागत करतात. इतरत्र धुंदीत, फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागताची पद्धत रुजली असताना गौतम खटोड या तरुण व्यावसायिकाने ‘नाचू कीर्तनाचे रंगी’ याची सवय लावली. तब्बल १० वर्षांपासून सुरू असलेला हा कीर्तन महोत्सव ग्रामीण संस्कृतीचे शक्तिपीठ झाला आहे. पसा कोणाकडे नाही, पण प्रपंचाच्या पुढे जाऊन सत्कार्यासाठी खर्च करणारे विरळाच. सामाजिक-राजकीय कोणत्याही अपेक्षेशिवाय केवळ समाजाला चांगली सवय लागावी, यासाठी दरवर्षी १२ दिवस होणाऱ्या या धार्मिक यज्ञात अनेक दिग्गज हजेरी लावतात. कीर्तनाचा, भाषणाचा दुरूनही संबंध नसताना हे व्यासपीठ निर्माण करणारे गौतम खटोड यामुळेच चच्रेत आहेत.
शहरातील तरुण व्यावसायिक गौतम खटोड व सुशील खटोड या बंधूंनी १० वर्षांपूर्वी वडिलांच्या स्मरणार्थ, झुंबरलाल खटोड सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने कीर्तन महोत्सव सुरू केला. इतर महोत्सवांप्रमाणेच हा महोत्सव चालेल का, अशी शंका अनेकांनी उपस्थित केली. समाज पाश्चात्त्य संस्कृतीकडे झुकतो आहे. मराठी माणूस लावणीचा रसिक. त्यामुळे इतर महोत्सव सुरू होतात नि बंदही पडतात. कीर्तन हेही समाजप्रबोधनाचे प्रभावी माध्यम असताना त्यास राजाश्रय मात्र मिळाला नाही. नववर्षांचे स्वागत सर्वत्र फटाक्यांची आतषबाजी नि धुंदीत होण्याची पद्धत रूढ झाली असताना खटोड बंधूंनी मात्र नववर्षांचे स्वागत ‘नाचू कीर्तनाचे रंगी’ या भावनेने सुरू केले.
३१ डिसेंबर ते ११ जानेवारी दरम्यान होणाऱ्या या महोत्सवाचे नियोजन राष्ट्रीय कीर्तनकार भरतबुवा रामदासी यांच्याकडून केले जाते. १० वर्षांत राज्यभरातील नामांकित व्यक्तींनी हजेरी लावली. कॉपीमुक्ती चळवळ याच महोत्सवातून पुढे आली. शिक्षण, शेती, अर्थकारण, समाजकारण अशा क्षेत्रातील नामवंतांनी या व्यासपीठावरून विचारांचे दान केले. नववर्षांचे स्वागत आनंदी व चांगल्या वातावरणात करण्यासाठी लोकही हजारोच्या संख्येने महोत्सवात हजेरी लावतात. जवळपास १० हजारांपेक्षा जास्त लोक एकाच वेळी बसू शकतील, असा सभामंडप उभारलेला असतो. सार्वजनिक कार्यक्रम असला, की ‘पावत्या फाडण्या’ची पद्धत रूढ आहे. पण खटोड बंधूंनी याला फाटा देऊन वर्षभर व्यवसायातून मिळवलेले १५ ते २० लाख रुपये महोत्सवावर खर्च करण्याचा निश्चय केला.
कोणत्याही अपेक्षेशिवाय खटोड बंधूंनी सुरूकेलेला हा महोत्सव आता बीडचा सांस्कृतिक चेहरा झाला आहे. तालुक्यातील कुंभारी वडगाव या छोटय़ाशा गावातील झुंबरलाल खटोड १९६४च्या दशकात लोखंडी दुकानावर ३०० रुपये महिन्याने गाडा ओढण्याचे काम करीत. पत्नी निर्मला, मुलगा गौतम, सुशील व वंदना ही तीन अपत्ये. त्यांचा सांभाळ मजुरी करून करताना खटोड यांच्या जीवनात संत भगवानबाबा यांच्या सान्निध्यानंतर परिवर्तन झाले आणि ते पूर्णपणे धार्मिक कार्याकडे ओढले गेले. त्यांच्या अकाली निधनानंतर मुलांनी व्यवसाय सुरूकेला, उद्योगधंद्यात चांगले यश मिळाल्यानंतर संसारासाठी लागणाऱ्या पशापेक्षा आलेला पसा साचवून न ठेवता तो चांगल्या कामासाठी खर्च केला पाहिजे, असे ठरविले. त्यातून सुरुवातीला गोशाळा सुरू केली. कत्तलखान्यात गेलेल्या ८०० गायी परत आणून शेतकऱ्यांना मोफत वाटप केल्या. गरजूंना कपडे, अंध-अपंगांना मदत करण्याचे उपक्रम सुरू असतानाच नव्या पिढीला आणि समाजाला चांगले प्रबोधन मिळावे, यासाठी २००४मध्ये राज्यस्तरीय कीर्तन महोत्सव सुरू केला. १० वर्षांत या महोत्सवात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, उज्ज्वल निकम, डॉ. विजय भटकर, डॉ. तात्यासाहेब लहाने, डॉ. प्रकाश आमटे, भारती आमटे, डॉ. राणी बंग, सिंधुताई सपकाळ, भयू महाराज, पं. हृदयनाथ मंगेशकर, शिवाजीराव भोसले, राम शेवाळकर, लक्ष्मण देशपांडे, स्वप्नील बांदोडकर, ढोकमहाराज, अण्णासाहेब मोरे, विवेक सावंत, सनदी अधिकारी भास्कर मुंडे, राजीव खांडेकर यांच्यासह राज्यभरातील दिग्गजांनी हजेरी लावली. ११ दिवस रोज दोन कीर्तन, सांस्कृतिक कार्यक्रम, चर्चासत्र, मुलाखत या महोत्सवात होते.