जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत अध्यक्षा मीनाक्षी बोंढारे यांनी सभागृहात टेबलावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्र ठेवले. विरोधकांनी याबद्दल विचारणा केली. मात्र, यावर समाधानकारक उत्तर न मिळाल्याने विरोधी सदस्यांनी सभागृहातून बहिष्कार केला, तसेच बैठकीतील सर्व निर्णय रद्द करावेत, या मागणीचे निवेदन विभागीय आयुक्तांना पाठवले.
जिल्हा परिषदेतील गुरुवारच्या विशेष सर्वसाधारण सभेच्या पटलावर शिक्षणाचा सार्वजनीकरणाचा अधिकार, जिल्ह्य़ातील पाणीटंचाई आढावा व आराखडा असे केवळ दोनच महत्त्वाचे विषय होते. विरोधकांनी सभात्याग केल्यानंतर शिक्षणाच्या विषयावर सविस्तर चर्चा झाली. परंतु पाणीटंचाईच्या प्रश्नावर सभागृहात पाणीटंचाईचे संपूर्ण नियोजित आराखडे व माहिती प्राप्त न झाल्याने हा विषय पुढील बैठकीत ठेवण्यात येणार असल्याचे अध्यक्षा बोंढारे यांनी सांगितले.
राष्ट्रवादीचे गटनेते मुनीर पटेल व काँग्रेसचे विनायक देशमुख यांनी पत्रकारांना सांगितले की, बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी आमच्या मनात आदर आहे. त्यांच्या निधनानंतर जि. प.च्या सभागृहात त्यांना सर्वपक्षीय आदरांजली अर्पण करण्यात आली. तसेच ठिकठिकाणी आदरांजली वाहण्यात आली, त्यात आम्ही सर्व सहभागी होतो. मात्र, जि. प.च्या सभेत बाळासाहेबांचे छायाचित्र टेबलावर कशासाठी, असा प्रश्न सभागृह सचिवांकडे केला असता, त्यांनी अध्यक्षांना विचारा असे उत्तर दिले. यावर अधिक वाद नको म्हणून आम्ही सभागृहाबाहेर पडलो. विरोधी सर्व सदस्यांच्या सह्य़ांनिशी आयुक्तांना निवेदन पाठविले. त्यात या सभेतील मंजूर प्रस्ताव रद्द करण्याची मागणी केल्याचे पटेल यांनी सांगितले.