गायरान जमिनीवर शतकोटी कार्यक्रमांतर्गत हिंगोली तालुक्यातील वरुडगवळी ग्रामपंचायतीने वृक्षलागवडीचा प्रस्ताव तहसीलदारांकडून मंजूर करवून घेतला. पण याच गावातील काही मंडळी वृक्षलागवड कार्यक्रमांतर्गत अडथळा निर्माण करीत असल्याने ग्रामस्थांनी आता कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे.
वरुड गवळीचे सरपंच जगन मापारी, ग्रामसेवक व ग्रामस्थांनी पोलीस अधीक्षकांना संरक्षणाच्या मागणीचे निवेदन दिले. ग्रामपंचायत हद्दीत शासकीय जमीन गट क्र. २५६ मधील क्षेत्र ५ हेक्टर ९२ आर जमिनीवर वृक्षलागवड करण्यास तहसीलदारांकडून परवानगी घेतली. पण गावातील काही मंडळी या कामात अडथळा निर्माण करीत आहेत. यामुळे गावच्या शांततेचा भंग होईल व वृक्षलागवड करता येणार नाही. हे काम पूर्ण करण्यास पोलीस संरक्षण द्यावे, अशी मागणी निवेदनात केली आहे.