नागपूर जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागात गेल्या बारा वर्षांत डेंगूचे २१० रुग्ण आढळले असून त्यापैकी सहाजण या रोगाने मरण पावले आहेत.
जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालय नागपूर (ग्रामीण) १ जानेवारी २००१ ते ३० नोव्हेंबर २०१२ या कालावधीत डेंगूचे २१० रुग्ण आढळले. यापैकी ६ रुग्ण मरण पावले. तसेच याच कालावधीत जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागात केलेल्या सर्वेक्षणात हिवतापाचे ८ हजार २९३ रुग्ण आढळले, असे जिल्हा हिवताप अधिकाऱ्यांनी अभय कोलारकर यांना माहितीच्या अधिकारात कळवले आहे.
डेंगूच्या नियंत्रणासाठी गृहभेट कार्यक्रमांतर्गत डास अळींचे सर्वेक्षण करण्यात येऊन घनतेनुसार टेमिफॉस फवारले जाते. आठवडय़ात एक दिवस ‘कोरडा दिवस’ म्हणून पाळला जातो. जिल्हा स्तरावर तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक आणि वैद्यकीय अधिकारी यांना आजाराचे निदान, उपचार व प्रतिबंधक उपाययोजनांचे प्रशिक्षण दिले
जाते.
त्याचप्रमाणे निमवैद्यकीय अधिकारी, आशा आणि गाव पातळीवर स्वच्छता समितीचे सदस्य यांना या आजारावरील उपाययोजनांची माहिती दिली जाते. डेंगूच्या उपाययोजनांसाठी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत १० हजार रुपये अनुदान देण्यात आले. जिल्ह्य़ातून नागपुरातील सर्व शासकीय व खाजगी रुग्णालयांत भरती होणाऱ्या सर्व संशयित रुग्णांची माहिती या कार्यालयाला कळवण्यात येते. त्यानंतर संबंधित रुग्णाचे रक्तजन नमुने गोळा करून तपासणीसाठी इंदिरा गांधी वैद्यकीय रुग्णालयातील प्रयोगशाळेत पाठवण्यात येतात.
डेंगूबाबत जनतेत जागृती आणण्याच्या उद्देशाने शेणाचे खड्डे बुजवणे, व्हेंट पाईपला जाळी लावणे, वैयक्तिक संरक्षणासाठी झोपताना मच्छरदाणीचा वापर करणे, कीटकजन्य आजारांची माहिती देणे इ. कार्यक्रम हाती घेण्यात आले. आदिवासी तालुक्यांत मच्छरदाण्यांचे वाटप करण्यात आले. पाण्याचे साठे दर आठवडय़ाला किमान एकदा रिकामे करून घासूनपुसून कोरडे करून पुन्हा वापरावे, तसेच पाणीसाठे व्यवस्थित झाकून ठेवावे हे उपाय महत्त्वाचे असल्याने त्यासाठी जनजागृती करण्यात आली. जिल्हा स्तरावर एकूण २१ धूर फवारणी यंत्रे उपलब्ध असून सोबतच ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरही ही यंत्रे आहेत. नियमित कीटकनाशक फवारणी अंतर्गत हिवताप अतिसंवेदनशील भागात तसेच उद्रेकग्रस्त गावांमध्ये ‘अल्फासायफरमेथ्रिन’ या कीटकनाशकाची फवारणी करण्यात आली. जिल्ह्य़ातील प्राथमिक शाळांमध्ये कीटकजन्य आजारांविषयी माहिती देण्यात येऊन गप्पी मासे व डास अळीचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले, अशा प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहितीही जिल्हा हिवताप अधिकाऱ्यांनी दिली आहे.