माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेच्या निकालात गेल्या वर्षीच्या तुलनेत १९ टक्क्यांची सुधारणा घडवून आणत यंदा अमरावती विभागाने ८२.१९ अशी टक्केवारी गाठली आहे. नऊ विभागीय मंडळांमध्ये अमरावती विभागाचे स्थान पाचवे आहे. विभागातून ८५ हजार १७५ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी ७० हजार विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यात यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. गेल्या वर्षी निकालाच्या टक्केवारीत राज्यातून अमरावती विभाग सर्वात तळाशी होता. २०११ मध्ये ‘कॉपीमुक्त’ मोहिमेच्या धडाक्यात अमरावती विभागाचा निकालातील वरचढीचा फुगा फुटला होता. त्यावर्षी राज्यात सर्वात कमी म्हणजे ४०.८० टक्केनिकाल होता. गेल्या वर्षी १४ टक्क्यांची वाढ होऊन निकाल ६२.८७ टक्क्यांपर्यंत पोहोचला. यंदा त्यात अजून सुधारणा झाली.
अमरावती विभागीय मंडळामार्फत बारावीची परीक्षा ४४३ केंद्रांवरून घेण्यात आली होती. विज्ञान शाखेचा निकाल ९२.७० टक्केलागला आहे. गेल्या वर्षी तो ७६.४२ टक्के होता. कला शाखेतून गेल्या वर्षी ५२.९३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. यंदा या शाखेतील ७४.२२ टक्के विद्यार्थ्यांना यश मिळू शकले. वाणिज्य शाखेतून ७९.३९ टक्के विद्यार्थी यशस्वी ठरले. गेल्या वर्षीच्या तुलनेत १८.७० टक्क्यांची वाढ झाली.  एम.सी.व्ही.सी.चा निकाल गेल्या वर्षी ७२.४६ टक्के होता. तो यंदा ८४.५७ टक्के आहे.
अमरावती विभागात निकालाच्या टक्केवारीत वाशीम जिल्ह्य़ाने अव्वल स्थान पटकावले आहे. या जिल्ह्य़ाचा निकाल ८५.२५, बुलढाणा  ८४.४८, अकोला ८४.१३, अमरावती ८३.५६ आणि यवतमाळ जिल्ह्य़ाचा निकाल ७५.३७ टक्के लागला आहे. अमरावती विभागात उत्तीर्णतेच्या टक्केवारीत मुलींनी यंदाही बाजी मारली असून ८५.९३ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ७९.१३ टक्के आहे. जुन्या अभ्यासक्रमानुसार विभागात २५ हजार ३८५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, त्यापैकी केवळ ७ हजार २९२ म्हणजे २८.७३ टक्केच विद्यार्थी उत्तीर्ण होऊ शकले. विभागात ४ हजार १४ विद्यार्थ्यांनी ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण, तर ७ हजार ५३४ जण काठावर पास झाले आहेत.
विभागात गेल्या वर्षी १७५९ विद्यार्थ्यांनी गुणपडताळणीसाठी अर्ज केले होते, त्यापैकी केवळ ३७ विद्यार्थ्यांच्या गुणात, तर १६ विद्यार्थ्यांच्या निकालात बदल झाला. विभागात परीक्षेच्या काळात कॉपीची १३५ प्रकरणे निदर्शनास आली. त्यावर चौकशी सुरू असल्याचे विभागीय मंडळाचे अध्यक्ष संजय गणोरकर यांनी सांगितले. यंदापासून उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य आहे. छायाप्रत मिळाल्यानंतर पाच दिवसांत शुल्क भरून संबंधित विद्यार्थ्यांना मंडळाकडे अर्ज करावा लागेल, छायाप्रत संबंधित शिक्षक किंवा मुख्याध्यापकांना दाखवल्यास विद्यार्थ्यांना पुनर्मूल्यांकनाबाबत अधिक माहिती मिळू शकेल, असे गणोरकर यांनी सांगितले.
यंदा अमरावती विभागाचा निकाल गेल्या वर्षीपेक्षा १९.२२ टक्क्यांनी वाढला आहे. फिजिक्स या विषयाचा निकाल कमी लागेल, अशी चर्चा होती. पण या विषयात ८९.५४ टक्के म्हणजे समाधानकारक संख्येत विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी विभागात ६६ परीक्षा केंद्रांवर चित्रीकरण करण्यात आले. ४४३ बैठय़ा पथकांनी कॉपी रोखण्यासाठी प्रयत्न केले, अशी माहिती मंडळाचे सचिव व्ही. के. जोशी यांनी दिली.