अनेक वर्ष विकासापासून वंचित असलेला तालुक्याचा पूर्व भाग पाच वर्षांपूर्वी सिन्नर विधानसभा मतदारसंघाला जोडला गेल्याने या भागात कोटय़वधी रूपयांच्या योजना राबविल्या गेल्या असे प्रतिपादन आ. माणिकराव कोकाटे यांनी केले. उर्वरित काळातही विकास कामांना प्राधान्य देण्याची ग्वाही त्यांनी दिली.
तालुक्यातील बेलगाव तऱ्हाळे येथील सामाजिक सभागृह, अंगणवाडी इमारत, गावातंर्गत रस्ता काँक्रिटीकरण, सौरदीप, स्मशानभूमी परिसरात निवाराछत अशा विविध कामांचे उद्घाटन कोकाटे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अर्थ बांधकाम समिती सभापती अलका जाधव उपस्थित होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून राजेश नवाळे, जनार्दन माळी, कचरू डुकरे, सिन्नरचे सभापती कचरू डावखरे आदी उपस्थित होते. कोकाटे यांनी या भागातील ४० गावामध्ये विविध योजनाा  पोहचविण्यासाठी गेल्या साडेचार वर्षांत केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. गट-तट, वैचारिक मतभेद बाजूला सारून विकास कामे केली. केवळ सुखदु:खात समरस होण्याचे नाटक करण्यापेक्षा त्यांच्या भावनांची कदर करीत कर्तव्यभावनेने विकास पोहचविण्यावर आपला भर असतो असेही त्यांनी नमूद केले. प्रास्तविक पंचायत समिती सदस्य पांडूरंग वारुंगसे यांनी तर सूत्रसंचालन विजयकुमार कर्डक यांनी केले.