ठाण्यातील ढोकाळी परिसरात महापालिकेच्या पुढाकाराने उभारण्यात आलेल्या मिनी स्टेडियमला शहर विकास विभागाने अखेर ‘वापर परवाना’ देऊ केला आहे. या स्टेडीयमला भोगवटा प्रमाणपत्र मिळाले नसतानाही लोकसभा निवडणुकीपूर्वी तत्कालिन खासदार संजीव नाईक यांनी राष्ट्रवादी कॉग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत या स्टेडियमचा शुभारंभ कार्यक्रम उरकला होता. मात्र तरीही हे स्टेडीयम ठाणेकरांसाठी खुले करण्यात आले नव्हते. बदली होण्याच्या अखेरच्या दिवशी माजी आयुक्त असीम गुप्ता यांनी या स्टेडियमच्या बांधकामाला भोगवटा प्रमाणपत्र देत वापरातील मोठा अडथळा दूर केला आहे.
ठाणे शहराच्या पश्चिमेकडे झपाटय़ाने विकसित होत असलेल्या घोडबंदर परिसरातील क्रीडाप्रेमींसाठी एखादे स्टेडियम उभारले जावे, अशी कल्पना काही वर्षांपूर्वी पुढे आली. राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे या भागातील नेते संजय भोईर यांनी ही कल्पना उचलून धरली आणि ढोकाळी या त्यांच्या प्रभागात एका मोकळ्या भूखंडावर स्टेडियम उभारावे अशा स्वरुपाचा प्रस्ताव मांडला.
तत्कालिन खासदार संजीव नाईक यांनाही ठाणे महापालिका हद्दीत खासदार निधीतून एखादा प्रकल्प उभा करायचा होता. त्यामुळे त्यांनी आपला खासदार निधी या प्रकल्पासाठी देण्याचे निश्चित केले. पाच कोटी रुपयांच्या खासदार निधीत महापालिकेने २० कोटी रुपयांची भर टाकली आणि २५ कोटी रुपयांचा एकत्रित स्टेडियम प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले.
वेगवान हालचाली
आधुनिक पद्धतीने उभारण्यात आलेले हे स्टेडीयम खेळाडूंसाठी खुले व्हावे यासाठी वेगवान हालचाली सुरूग करण्यात आल्या आहेत. स्डेडीयमच्या इमारतीला भोगवटा प्रमाणपत्र नुकतेच देण्यात आले आहे, अशी माहिती शहर विकास विभागातील वरिष्ठ सुत्रांनी ‘ठाणे लोकसत्ता’ला दिली. असीम गुप्ता यांनी बदली होण्यापूर्वी दोन दिवस आधी यासंबंधीच्या फाइलवर स्वाक्षरी केली, असेही सूत्रांनी स्पष्ट केले. दरम्यान, या भागातील स्थानिक नगरसेवक संजय भोईर यांनी मध्यंतरी स्थानिक संस्थेस हे क्रीडासंकुल चालविण्यास दिले जावे, अशी मागणी केली होती. मात्र, सत्ताधारी शिवसेनेने या प्रस्तावास विरोध केला आहे. त्यामुळे भोगवटा प्रमाणपत्र मिळाल्यानंतर आता हे स्टेडियम कुणाला चालविण्यास मिळणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.