महानगरपालिका निवडणुकीतील भारतीय जनता पक्ष-शिवसेना युतीतील जागावाटपाचा तिढा अखेर सोमवारी दुपारी सुटला. मात्र दोन्ही पक्षांच्या उमेदवारांची घोषणा रात्री उशिरा किंवा उद्या (मंगळवार) सकाळीच होतील. भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांना अखेर प्रभाग २७-ब वरील दावला सोडून द्यावा लागला, ही जागा शिवसेनेलाच गेली असून महापौर शीला शिंदे यांचा मार्ग त्यामुळे मोकळा झाला आहे. मात्र त्यामुळे याच प्रभागातील दुसऱ्या जागेसाठी आगरकर यांच्या पत्नी अनिता की उपमहापौर गितांजली काळे असा प्रश्न भाजपसमोर आहे.
भाजप-शिवसेना युतीतील ताणाताणी अखेर आज मिटली. त्यासाठी गेल्या चार दिवसांपासून मुंबईत श्रेष्ठींच्या पातळीवरच बैठका सुरू होत्या. रविवारी युतीचे ६२ प्रभागांमधील जागावाटप मुंबईहूनच जाहीर झाले. राहिलेल्या ६ प्रभागांचा तिढा सोमवारी सायंकाळी अखेर सुटला. त्यानुसार प्रभाग क्रमांक ९ व १० मधील चारही जागा शिवसेना, ११ मधील अ (महिला) जागा भाजप व ब (सर्वसाधारण पुरूष) जागा शिवसेना, १७ मधील अ (महिला) जागा शिवसेना व ब (सर्वसाधारण पुरूष) जागा भाजप, प्रभाग २० मधील दोन्ही जागा भाजप आणि २७ मधील शिवसेनेला देण्याचे निश्चित करण्यात आले.
भाजप-शिवसेनेच्या जागावाटपात प्रभाग क्रमांक २७ चा मोठा खोडा होता. युतीच्या पातळीवर तो सुटला असला तरी भाजपमध्ये मात्र त्याचा गुंता वाढला आहे. या प्रभागातील एका जागेवर महापौर शीला शिंदे (शिवसेना) व दुसऱ्या जागेवर उपमहापौर गितांजली काळे (भाजप) यांचा दावा असतानाच पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांनी स्वत:च यातील एका म्हणजे सर्वसाधारण जागेवर जोरदार मोर्चेबांधणी केली होते. या उमेदवारीसाठी आगरकर आग्रही होते. ही जागा नेमकी महापौरांची मानली जाते. त्यामुळे शिवसेना ती सोडण्यास तयार नव्हती. अखेर आज भाजपला ही जागा सोडावी लागली, त्यामुळे भाजपच्या वाटय़ाला गेलेल्या दुसऱ्या जागेवर आता श्रीमती काळे की आगरकर असा प्रश्न निर्माण झाला असून हा गुंता भाजप कसा सोडवतो याबाबत उत्सुकता आहे.    
भाजप-शिवसेना युतीतील प्रभागांचे वाटप निश्चित झाले असले तरी उमेदवारांची नावे सायंकाळी उशिरापर्यंत निश्चित झालेली नव्हती. भाजपने त्यासाठी रात्री ९ वाजता बैठक होणार आहे. शिवसेनेचेही उमेदवार रात्री उशिराच ठरणार आहेत.

आगरकर यांनाच प्राधिकृती?
भाजपच्या एबी फॉर्मबाबत पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रताप ढाकणे व शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांच्यावर संयुक्त जबाबदारी टाकल्याची चर्चा होती. मात्र हे अधिकार एकटय़ा आगरकर यांनाच असल्याचे सांगण्यात आले. यातील उमेदवार प्राधिकृत करण्याबाबतचा विहीत ‘ए’ फॉर्म त्यांनी सोमवारीच निवडणूक अधिकाऱ्यांकडे दाखल केल्याचे समजते. त्याच्याच आधारावर आता उद्या उमेदवारांना  ‘बी’ फॉर्म देण्यात येतील असे सांगण्यात आले.