कामगार पदाधिकाऱ्यांनी चर्चेत सहभागी न होता परस्पर तोडगा काढावा, अशी भूमिका घेतल्याने अट्राटेकमध्ये सुरू असलेल्या कामगार व व्यवस्थापनामधील वादावर तोडगा काढण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा प्रयत्न आज सफल होऊ शकला नाही. दरम्यान, या प्रकरणात आपल्याकडून कुणाचीही दिशाभूल करण्यात आली नाही, असे जिल्हाधिकारी विजय वाघमारे यांनी आज सांगितले.
जिल्हाधिकाऱ्यांनी आज या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी बैठक बोलावली होती. या बैठकीला कामगार आयुक्त, व्यवस्थापनाचे प्रतिनिधी हजर होते. नंतर कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना बोलावण्यात आले. या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षात येण्यास नकार देऊन सहायक कामगार आयुक्तांना बाहेर बोलावून त्यांना मागण्यांचे निवेदन दिले. जिल्हाधिकाऱ्यांनी आजवर घेतलेल्या भूमिकेमुळे आम्ही बैठकीला हजर राहणार नाही, तुम्ही परस्पर तोडगा काढा व आम्हाला कळवा, अशी भूमिका या पदाधिकाऱ्यांनी घेतली. यावर बैठकीत विचार करण्यात आला. बैठकीला हजर असलेले प्रादेशिक सहायक आयुक्त सांबाशिवराव यांनी कामगारांच्या नेमक्या मागण्या आम्हाला मिळालेल्या नाहीत, असे स्पष्टपणे सांगितल्याने कोणतीही चर्चा न होता ही बैठक संपवण्यात आली. आजच्या घडामोडीवरून कामगार संघटनेचे पदाधिकारी केवळ व्यवस्थापनावरच नाही, तर जिल्हाधिकाऱ्यांवर सुध्दा नाराज असल्याचे दिसून आले.
या पाश्र्वभूमीवर जिल्हाधिकारी विजय वाघमारे यांना विचारणा केली असता संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व काही नेत्यांनी आपल्यावर केलेले आरोप निराधार आहेत, असे ते म्हणाले. या प्रकरणात जिल्हा प्रशासनाने कधीही कामगारांची दिशाभूल केली नाही. उलट, आंदोलन चिघळू नये म्हणून आज बैठक बोलावली होती. तरीही पदाधिकारी आले नाहीत. येत्या काळातही या आंदोलनावर तोडगा निघावा, या दृष्टीने प्रशासनाचा प्रमुख या नात्याने आपण प्रयत्न करत राहू, असे वाघमारे यांनी आज सांगितले.