पदवी परीक्षेच्या पहिल्या व दुसऱ्या वर्षी बहुपर्यायी प्रश्नांना मोठे महत्त्व देत देशात प्रथमच वेगळा प्रयोग करू पाहणाऱ्या नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची गुणवत्ताच आता धोक्यात आल्याची भीती शिक्षणक्षेत्रात व्यक्त केली जात आहे. बहुपर्यायी परीक्षेची पद्धत स्वीकारू नये, अशी शिफारस विद्यापीठाच्या अभ्यास मंडळ व विद्या शाखेने केलेली असतानाही प्रत्यक्षात विद्या परिषदेने अधिकार नसतानाही परीक्षा पद्धतीत बदल केले आहेत!
पदवी परीक्षेच्या उत्तरपत्रिका प्राध्यापक व्यवस्थित तपासत नाहीत. विद्यार्थ्यांनी पुनर्तपासणी अर्ज केल्यानंतर अनेक त्रुटी आढळतात. या साठी ५०पकी ४० गुणांची परीक्षा विद्यापीठ बहुपर्यायी प्रश्नाद्वारे घेते व उर्वरीत १० प्रश्नांची परीक्षा संबंधित महाविद्यालयाने घेण्याची प्रथा आहे. २०११-१२ व २०१२-१३ या शैक्षणिक वर्षांत ही परीक्षा पद्धती अवलंबण्यात आली. देशात असा प्रयोग प्रथमच स्वारातीम विद्यापीठात करण्यात आला. २०१३-१४ या वर्षी तिसऱ्या वर्षांत शिकणाऱ्या पदवीच्या विद्यार्थ्यांना मात्र दीर्घोत्तरी प्रश्नावली दिली जाणार आहे. परंतु सलग २ वष्रे बहुपर्यायी प्रश्न सोडवून परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना दीघरेत्तरी प्रश्नांची सवयच नसल्याने ते चांगलेच अडचणीत येत आहेत.
विद्यापीठातील अनेक महाविद्यालयांतून १० गुणांची परीक्षा न घेता केवळ विद्यार्थ्यांना गुण दिले गेले आहेत. विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू डॉ. जनार्दन वाघमारे यांनी आपल्या कारकीर्दीत विद्यापीठ कॉपीमुक्त केले होते. त्याची कडक अंमलबजावणी झाली. त्यामुळे डॉ. वाघमारे यांचे कौतुक झाले होते. गेल्या दशकभरात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. विद्यापीठात मोठय़ा प्रमाणात कॉपीसत्र सुरू झाले. परीक्षेत कॉपी, लघुत्तरी प्रश्न यामुळे विद्यार्थ्यांचे गुणवत्तेकडे लक्ष नाही. पदवी घेऊन बाहेर पडल्यानंतर राज्यातील अन्य विद्यापीठांच्या तुलनेत या विद्यापीठाचे विद्यार्थी टिकाव कसे धरतील? हा मोठा प्रश्न आहे.
साधारण २५ वर्षांंपूर्वी मराठवाडा विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी नोकरीसाठी अर्ज करू नयेत, अशा जाहिराती दिल्या जात होत्या. दुर्दैवाने पुन्हा अशीच स्थिती ओढवण्याची शक्यता वाढली आहे. परीक्षा विभागात मोठय़ा प्रमाणात गोंधळ आहे. विद्यार्थ्यांचे निकालपत्र महाविद्यालयाकडे पाठवल्यानंतर विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेत मोठय़ा प्रमाणात चुका होतात व वारंवार त्या दुरुस्त करून देण्यास संबंधित महाविद्यालयास विद्यापीठाकडे खेटे घालावे लागतात. अनेक विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेत चुकीचे गुण दिले गेल्यामुळे त्यांना मोठय़ा प्रमाणावर मनस्ताप सहन करावा लागतो आहे. परीक्षेचे हॉलतिकीट वेळेवर न प्राप्त झाल्यामुळे विद्यार्थ्यांनी आत्महत्या करण्याचे प्रकारही घडले आहेत. लातूरच्या बसवेश्वर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे उदाहरण ताजे आहे.
विद्यापीठाने बहुपर्यायी परीक्षेची पद्धत स्वीकारू नये, अशी शिफारस विद्यापीठाच्या अभ्यास मंडळ व विद्या शाखेने केलेली असतानाही विद्या परिषदेने अधिकार नसतानाही परीक्षा पद्धतीत बदल केले आहेत. वास्तविक, अभ्यास मंडळ व विद्याशाखेने केलेली शिफारस विद्या परिषदेस डावलता येत नाही. मात्र, ‘हम करे सो कायदा’ या पद्धतीमुळे विद्यापीठात मनमानी वाढली, परिणामी विद्यार्थ्यांचे भवितव्यच संकटात सापडले आहे.