राज्य व केंद्रातील सरकारने आपल्या कारकीर्दीत शेतकऱ्यांची हत्या करण्याचे पाप केले आहे. आगामी निवडणुकीत अशा सरकारचे विसर्जन करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा आमदार पंकजा पालवे यांनी केले.
औसा तालुक्यातील लोदगा येथून औरंगाबाद विभागीय आयुक्तालयापर्यंत भाजपा किसान मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष पाशा पटेल यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी िदडीचा प्रारंभ झाला. या प्रसंगी पालवे बोलत होत्या. आमदार सुधाकर भालेराव, माजी खासदार रूपाताई पाटील निलंगेकर, डॉ. गोपाळराव पाटील, माजी आमदार टी. पी. कांबळे, भाजपाचे प्रदेश सरचिटणीस सुरजित ठाकूर, नागनाथ निडवदे, बळवंत जाधव, राजकुमार सस्तापुरे, ज्ञानोबा मुंडे, आर. टी. देशमुख यांची उपस्थिती होती.
पालवे म्हणाल्या की, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर बोलण्यास आपल्याला संधी मिळते. शेतीतला आपला अनुभव कमी असला, तरी माझे अंत:करण शेतकऱ्याचे आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नासंबंधी प्रसंगी स्वत:चे रक्त सांडण्यासही आपण तयार आहोत. आपल्या देशावर प्रारंभी मोगल, नंतर ब्रिटिश व स्वातंत्र्यानंतर ब्रिटिशांचाच वसा चालवणारे काँग्रेस सरकार आहे. शेतकरी शहाणा झाला, त्याच्या खिशात चार पसे आले तर तो आपल्याला सत्तेवर राहू देणार नाही हे त्यांना माहिती असल्यामुळे कायम शेतकरीविरोधी धोरणे राबवली जात असल्याची टीका पालवे यांनी केली. भाजपाचे सरकार काहीकाळ सत्तेत आले, तेव्हा शेतकरीहिताची धोरणे राबवली गेली. शेतकरी शहाणा झाला होता. मात्र, या शहाण्या शेतकऱ्याने सरकारलाच घरी पाठवल्यामुळे आज असे वाईट दिवस आल्याचा आरोप त्यांनी केला.
सोयाबीनला किमान ६ हजार रुपये भाव मिळाला पाहिजे, कापसाची निर्यात बंद व्हायला हवी, तेलावरील आयातशुल्क ९० टक्क्य़ांपर्यंत वाढवले पाहिजेत. पेट्रोलमध्ये इथेनॉलचा वापर २५ टक्के केला पाहिजे, या मागण्यांसाठी लोदगा ते औरंगाबाद आयुक्तालय अशी पायी िदडी आपण काढल्याचे पाशा पटेल म्हणाले. माजी खासदार डॉ. पाटील यांनी दूध, फळे व फुलांच्या उत्पादनात जगात भारताचा पहिला क्रमांक असूनही निर्यातीत मात्र आपण मागे आहोत. सरकारच्या धोरणामुळे शेतकऱ्यांची माती होते आहे. या सरकारला आता कायमचे घरी पाठवा, असे आवाहन केले. भाजपाचे प्रदेश सरचिटणीस सुरजित ठाकूर, राजकुमार सस्तापुरे आदींची भाषणे झाली.
‘लहान झाल्याशिवाय
मोठे होता येत नाही’!
मी तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले असल्याचे काहीजण मला बोलतात. माझ्या तोंडात सोन्याचा चमचा असला तरी पायाला काटे टोचतात. तुम्हाला मोठे व्हायचे असेल तर अगोदर लहान व्हा ही शिकवण आम्हाला आहे. सामान्य माणसांत मिसळत असल्यामुळे काटे मला न बोचता ते मऊ लागतात, असे आमदार पालवे यांनी सांगितले.