कर्तव्य पार पाडण्यात अपयशी ठरल्याने व्यथित झालेल्या डागा रुग्णालयातील एका अस्थिरोग तज्ज्ञाने रुग्णालयातील सेवेचाच त्याग केला. रुग्णालयात सेवा देत असताना एका बाळावर उपचार न करू शकल्याने व्यथित झाल्याने त्यांनी रुग्णालयाला सोडचिठ्ठी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.
टिमकी भागात राहणाऱ्या पिंकी मौदेकर प्रसुतीसाठी डागा रुग्णालयात दाखल झाल्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू असताना प्रसुती दरम्यान बाळाचा हात लचकल्याचे लक्षात आले. ज्या दिवशी घटना घडली होती त्यादिवशी अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. अमित नेमाडे सुटीवर होते त्यामुळे त्यांच्यावर वेळेवर उपचार होऊ शकले नाहीत. शासनाच्या जननी शिशू सुरक्षा योजनेतंर्गत बाळाला ने आण पासून औषधांपर्यंत सर्व सेवा मोफत आहे. तरीसुद्धा योजनेचा लाभ डागा प्रशासनाने दिला नाही. दरम्यान, बाळाची प्रकृती बघता त्याला आणि त्याच्या आईला मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. प्रसुतीच्यावेळी डॉक्टरांच्या चुकीमुळे नवजात बालकाचा हात लचकला त्यामुळे त्यांच्यावर तात्काळ उपचार होणे आवश्यक होते. मात्र, डॉ. नेमाडे त्या दिवशी सुटीवर होते. डॉ. नेमाडे सुटी आटोपून कामावर रुजू झाल्याने त्यांना संबंधितांनी बाळाचा हात लचकल्याची माहिती सांगितली. डॉ. नेमाडे सुटीवर असल्याने बाळावर उपचार होऊ शकले नाही, असा अपप्रचार रुग्णालयात केला जाऊ लागला. त्यामुळे डॉ. नेमाडे व्यथित झाले आणि त्यांनी यापुढे डागा रुग्णालयात सेवा देणार नसल्याचे प्रशासनाला सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली. अशा घटना जर यापुढे रुग्णालयात घडल्या तर त्या बाळांवर उपचार करणार कोण? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. डागा रुग्णालयात अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टरांचे पद नाही त्यामुळे ते बाहेरून अस्थिरोग तज्ज्ञांना बोलवत असतात. गेल्या अनेक वर्षांपासून डॉ. नेमाडे डागा रुग्णालयात सेवा देत आहेत.
या संदर्भात डागाच्या अधीक्षिका डॉ. वैशाली खेडीकर यांनी सांगितले, रुग्णालयात अस्थिरोग तज्ज्ञाचे पद नाही. त्यामुळे रुग्णालयाला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. बाळावरील उपचारांसाठी डॉ. नेमाडे यांना बोलवत असतो. मात्र, त्यादिवशी ते सुटीवर असल्याने रुग्णालयात येऊ शकले नाही. डॉ. नेमाडे सामाजिक बांधिलकी म्हणून रुग्णालयात सेवा देत होते. या घटनेमुळे आपली बदनामी झाली असे त्यांना वाटले आणि त्यांनी यापुढे
सेवा देणार नसल्याचे सांगितले. डॉ. नेमाडे यांची समजूत काढून त्यांना पुन्हा कामावर बोलावू, असे डॉ. खेडीकर म्हणाल्या.