महावितरण कंपनीकडून शेतकऱ्यांना व ग्राहकांना अवाच्या सवा देयके आकारली जात आहेत. नादुरुस्त डीपीसाठी ठेकेदारांकडे जाण्याचा सल्ला महावितरणचे अधिकारी देत आहेत. अशा अनेक तक्रारींचा पाढा शेतकऱ्यांनी सोमवारी आयोजित बठकीत आमदार राणा जगजितसिंह यांच्या समोर वाचला. यावर कृषिपंपाची वीज तोडू नका, अशा सूचना आमदार पाटील यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आलेल्या बैठकीस खासदार डॉ. पद्मसिंह पाटील, आमदार राणा जगजितसिंह पाटील, जिल्हाधिकारी डॉ. के. एम. नागरगोजे, महावितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता पापडकर यांची उपस्थिती होती. या बठकीत शेतकऱ्यांनी महावितरणच्या तक्रारींचा पाढा वाचला. या वेळी शेतकऱ्यांच्या लेखी तक्रारींचा जाब महावितरणच्या अधिकाऱ्यांना विचारण्यात आला. बठकीत महावितरणचे अधिकारी देत असलेली माहिती खोटी असल्याचा आक्षेप शेतकऱ्यांनी घेतला. काही शेतकऱ्यांनी महावितरण कंपनीकडून पसे घेतल्याखेरीज कामेच होत नसल्याचे सांगितले. तर काहींनी महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे देऊन वेळ निभावून नेण्याचा प्रयत्न केला जात असल्याची ओरड केली. एखादा ट्रान्सफॉर्मर जळाल्यास महावितरणच्या कार्यालयास खेटे घालावे लागतात. अधिकारी त्या वेळी संबंधित ठेकेदाराकडे जाण्याचा अनाहूत सल्ला देत असल्याच्या तक्रारी उपस्थित शेतकऱ्यांनी केल्या.
बठकीमध्ये आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी ३० जानेवारीपर्यंत थकीत बिलासाठी शेतीपंपांची वीज कनेक्शन न तोडण्याचे निर्देश दिले.