लोकसभा निवडणुकीच्या मतपेटय़ा ठेवण्यासाठी कल्याणमधील बाजार समितीच्या आवारातील एम टाईप इमारतींचा ताबा निवडणूक अधिकाऱ्यांनी घेतला आहे. ही प्रक्रिया करताना एक दिवसाची पूर्वसूचना देऊन व्यापाऱ्यांना त्यांच्या हक्काच्या जागेतून बाहेर काढल्याने सुमारे ३५० व्यापाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. नवीन जागेत स्थलांतरित करताना आमचे जे नुकसान होणार आहे ते प्रशासनाने भरून द्यावे. यासाठी आयोगाकडून काही निधी बाजार समितीकडे आला असल्याची माहिती आहे. तो निधी व्यापाऱ्यांना नुकसानभरपाई म्हणून वाटप करावा अशी मागणी फळ बाजार व्यापारी संघटनेचे पदाधिकारी सदा टाकळकर यांनी केली आहे.
बाजारातून बाहेर काढून बाजार समिती आवारात अन्य ठिकाणी स्थलांतरित केले आहे. ती जागा आडबाजूला असल्याने तेथे व्यवसाय होत नाही. दोन ते तीन दिवसांची फळे, भाजीपाला पडून राहतो. शिळा माल विकावा लागतो. अगोदरच सर्व व्यवसाय तोटय़ात चालले आहेत. त्यात एक महिना मतपेटय़ा बाजार समितीच्या आवारात राहणार असल्याने तोपर्यंत व्यापाऱ्यांना तोटय़ात  व्यवसाय करावा लागणार आहे. मतपेटय़ा ठेवण्यासाठी नवीन बांधकामे, विद्युत कामे करण्यासाठी तोडफोड करण्यात आली आहे. ही कामे १४ मे रोजीची मतमोजणी संपल्यानंतर व्यापाऱ्यांना करावी लागणार आहेत. हा भरुदड व्यापाऱ्यांनी का सहन करायचा, असा प्रश्न टाकळकर यांनी केला. आंदोलन, विरोध करून हा प्रश्न सुटणार नसल्याने आलेल्या निधीतून व्यापाऱ्यांना त्यांचे झालेले नुकसान भरून द्यावे, अशी आमची मागणी असल्याचे टाकळकर म्हणाले.