वर्धा लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदान काँग्रेस विरोधकांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या हिंगणघाट परिसरात झाले असून उंचावलेले मतदान निकालाची उत्सुकता वाढविणारे ठरले आहे. वर्धा लोकसभा मतदारसंघातील हिंगणघाट विधानसभा मतदारसंघात ६३.७५ टक्के मतदानाची नोंद झाली. वर्धा-५२.४१ टक्के, धामणगाव-५८.३४, मोर्शी-५६.२२, आर्वी-५७.४० व देवळीत ५२.५ टक्के मतदान झाले. ६१.४० टक्के पुरूष तर ५२.३३ टक्के महिला मतदारांची हजेरी लागली.
सेना आमदार अशोक शिंदेच्या हिंगणघाट क्षेत्रातील मतदानाची टक्केवारी विक्रमी ठरली आहे. लोकसभा निवडणुकीत कधीही स्वारस्य न दाखविण्याचा लौकिक राहलेल्या अशोक शिंदे यांनी जातीने हजर राहून मतदान करविल्याची पुष्टी भाजप नेत्यांनी दिली. कोरा, वासी, आजंती, समुद्रपूर या भागातही लक्षणीय झालेले मतदान कमळाच्या पथ्यावर पडल्याचे या नेत्यांचे म्हणणे आहे. त्या तुलनेने काँॅग्रेस आघाडीचे आमदार असलेल्या वर्धा, देवळी व धामणगाव क्षेत्रात मतांची टक्केवारी अपेक्षेएवढी नाही. या भागात भाजपला मताधिक्य मिळण्याचा दावा काँग्रेसनेने मोडून काढत आहे. कधी नव्हे ते मुस्लिम व दलित मतदार मतदानासाठी उत्साही दिसून आले. वर्धा शहरात तर या मतदारांच्या रांगाच लागल्या होत्या. तर भाजपचे बुथही आढळले नसल्याचा दावा कॉग्रेस नेत्यांनी केला. भाजपला िहगणघाटसह, आर्वी, मोर्शी व देवळीत घसघशीत मताधिक्य मिळण्याची खात्री वाटत आहे. मताधिक्याबाबत दोन्ही उमेदवारांकडून वरचढ दावे केल्या जात आहे. गतवेळपेक्षा जास्त झालेले मतदान, हेच त्यामागचे प्रमुख कारण ठरले आहे.