निवडणुकीत कार्यरत असलेल्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदान करणे निवडणूक आयोगाने सक्तीचे केले आहे. याचे उल्लंघन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा उपजिल्हाधिकारी व निवडणूक अधिकारी प्रदीप डांगे यांनी दिला आहे.
दिवसेंदिवस घटत असलेली मतदानाची टक्केवारी लक्षात घेऊन ती वाढवण्याच्या दृष्टीने निवडणूक आयोगाने मतदार जनजागृती मोहीम प्रत्येक लोकसभा मतदारसंघात राबवली असून त्यासाठी केंद्रीय निरीक्षकही नियुक्त केले आहेत. यावर्षीच्या लोकसभा निवडणुकीत ७५ टक्के मतदानाचे उद्दिष्ट निवडणूक आयोगाने ठेवले आहे. शासकीय कर्मचाऱ्यांसाठी ९० टक्के उद्दिष्ट दिले असल्याने निवडणुकीच्या कामावर असलेल्या सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांना मतदान करणे सक्तीचे केले आहे. कर्मचारी व अधिकाऱ्यांना पोस्टल बॅलेट मतपत्रिका दिली जाईल. जे कर्मचारी आदेशाचे पालन करणार नाहीत त्यांच्यावर कारणे दाखवा नोटीस बजावली जाईल व शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असे डांगे यांनी स्पष्ट केले. निवडणुकीच्या कामातून महिला कर्मचाऱ्यांना वगळण्याचा प्रयत्न केला जाईल. सध्यातरी महिला कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामावर घेण्यात आले नाही. हा प्रयोग प्रायोगिक तत्त्वावर राबवण्यात येणार असल्याचे डांगे यांनी सांगितले.