मतदान झाल्यानंतर तब्बल २१ दिवसांनी मतमोजणी होणार असल्याने उपरोक्त काळात ४,२०५ इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत रखवाली करण्याची जबाबदारी जिल्हा निवडणूक व सुरक्षा यंत्रणेवर राहणार आहे. मतमोजणीनंतर ही यंत्रे निवडणूक निरीक्षकांच्या उपस्थितीत अंबडच्या वेअर हाऊस येथे ठेवण्यात आली. त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था, सीसी टीव्ही कॅमेऱ्यांची नजर, शासकीय अधिकाऱ्यांची वाहने वगळता अन्य वाहनांना प्रतिबंध अशा वेगवेगळ्या स्तरावर मतदान यंत्राची सुरक्षाव्यवस्था जपली जाणार आहे.
मतदानानंतर मतमोजणी होईपर्यंत इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र सुरक्षित राखण्यासाठी कशा पद्धतीने व्यवस्था करावी याचे स्पष्ट निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. नाशिक व दिंडोरी या दोन्ही लोकसभा मतदारसंघांतील मतमोजणी अंबड औद्योगिक वसाहतीतील सेंट्रल वेअर हाऊस येथे होणार आहे. लोकसभा निवडणुकीसाठी नाशिक मतदारसंघात २०३६ तर दिंडोरीत २१६९ अशा एकूण ४२०५ यंत्रांचा वापर करण्यात आला. मतदान झाल्यावर सर्व मतदान केंद्रांवरील इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे पोलीस बंदोबस्तात या ठिकाणी आणण्यात आली. मतदान व मतमोजणी या कालावधीत २१ दिवसांचे अंतर असल्याने इतका प्रदीर्घ काळ त्यांची सुरक्षितता जपण्याचे आव्हान आहे.
इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांच्या सुरक्षिततेसाठी आयोगाने काही निकष निश्चित केले आहेत. त्यानुसार अंबडच्या सेंट्रल वेअर हाऊस येथे त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था उभारण्यात आली आहे. मुख्य जबाबदारी अर्थातच केंद्रीय सुरक्षा दलांवर आहे. ज्या ठिकाणी मतदान यंत्रे ठेवण्यात आली आहेत, त्या ठिकाणी जाण्यासाठी एकच प्रवेशद्वार असावे, असे आयोगाने स्पष्ट केले आहे. यदाकदाचित तिथे आणखी एखादे प्रवेशद्वार असल्यास ते विटांच्या बांधकामाने बंदिस्त करावे, असे सूचित करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने आवश्यक ती खबरदारी वेअर हाऊसमध्ये घेण्याकडे स्थानिक यंत्रणेचे लक्ष केंद्रित केले आहे.
मतदान यंत्र ठेवलेल्या पोलादी खोलीला दुहेरी टाळे व्यवस्था करणे, त्याची एक किल्ली या खोलीचा व्यवस्थापक आणि दुसरी किल्ली उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अन्य एका अधिकाऱ्याकडे ठेवणे बंधनकारक आहे. मतदान यंत्रे ठेवलेला परिसर आग वा महापुरासारख्या आपत्तीपासून सुरक्षित राखण्याची तजविज करणे क्रमप्राप्त आहे. मतदान यंत्र ठेवलेली पोलादी खोली अहोरात्र केंद्रीय राखीव पोलीस दल, पोलीस यंत्रणा यांच्या देखरेखीखाली राहील. तसेच या खोलीत सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. मतदान यंत्र ठेवलेल्या खोलीतील प्रत्येक घडामोडींवर नजर ठेवण्यासाठी भक्कम व्यवस्था उभारण्यात आली आहे. शासकीय व पोलीस अधिकारी या ठिकाणी अहोरात्र तैनात राहून सुरक्षा व्यवस्थेवर लक्ष ठेवतील. मतदान यंत्र ठेवलेल्या या परिसरात अखंडपणे वीज पुरवठा व्हावा, याकरिता खास दक्षता घेण्याची सूचना आयोगाने केली आहे. वीज पुरवठा खंडित झाल्यास अडचणी उद्भवू नये म्हणून जनरेटरची पर्यायी व्यवस्थाही करण्यात आली आहे.
केंद्रीय सुरक्षा दल, राज्य राखीव पोलीस दल आणि स्थानिक पोलीस यांच्या त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्थेत ही मतदान यंत्र राहणार आहे. निवडणुकीत सहभागी झालेले उमेदवार बाहेरून या सुरक्षा व्यवस्थेची पाहणी करू शकतात. मतदान यंत्र ठेवलेल्या परिसरात मात्र कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. या ठिकाणी प्रवेश देताना नियम व अटी आयोगाने निश्चित करून दिल्या आहेत. या ठिकाणी भेट देणाऱ्या प्रत्येक अधिकाऱ्याची नोंद करणे सुरक्षा यंत्रणांना बंधनकारक आहे. या परिसरात वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांची वाहने वगळता अन्य वाहनांना प्रतिबंध आहे. निवडणूक निर्णय अधिकारी मतदानापर्यंत दररोज प्रत्यक्ष या ठिकाणी भेट देऊन सुरक्षा व्यवस्थेचे अवलोकन आणि दिवसभरात येथे आलेल्यांची यादी तपासणी करतील.