ऊर्जेची कमतरता ही कायमस्वरूपी समस्या आहे. त्यावर तोडगा काढण्याचे प्रयत्नही सतत सुरू असतात. बहुतांश महाविद्यालयांच्या महोत्सवांमध्येही यासंदर्भात विविध प्रयोग होत असतात. ‘सोसायटी ऑफ मॅन्युफॅक्चरिंग इंजीन’ या संस्थेला ४० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने नुकतेच ‘मॅक एक्स्पो २०१४’ या आंतरमहाविद्यालयीन स्पध्रेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सहभागी झालेल्या विविध अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पर्यायी ऊर्जास्रोतांचे विविध प्रयोग सादर केले. त्यातील पहिल्या तीन प्रयोगांची ही थोडक्यात माहिती. ‘एल अ‍ॅण्ड टी’ उद्योगसमूहाचे माजी व्यवस्थापकीय संचालक पी. के. शहा आणि ‘सीमेन्स’चे माजी व्यवस्थापकीय संचालक उदय सरनोबत हे या स्पध्रेचे परीक्षक होते.
सौरकार
कुल्र्याच्या डॉन बॉस्को महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी एक नवी गाडी या स्पध्रेत सादर केली. तृतीय वर्ष अभियांत्रिकीच्या सात विद्यार्थ्यांच्या संघाने तयार केलेल्या सौर ऊर्जेवर चालणारी तीनचाकी गाडी आहे. ५०० वॉट ऊर्जेवर चालणाऱ्या या गाडीसाठी लागणारी ऊर्जा गाडी सुरू असतानाही तिच्या छतावरील सोलर पॅनेलमधून मिळते. पावसाळय़ात सूर्यप्रकाशा नसला किंवा रात्री गाडी चालवायची असेल, तर या गाडीच्या बॅटऱ्या नेहमीच्या वीजेवरही चार्ज करता येतात. एकदा चार्चिग झाल्यावर ही गाडी ताशी ४० किमी वेगाने ५० किमीअंतर कापू शकते. अवघ्या ४५हजार रुपयांमध्ये तयार केलेल्या या गाडीचा उपयोग शहरांमध्ये एका माणसाला रोजच्या प्रवासासाठी, रोजचे सामान बाजारातून आणण्यासाठी होऊ शकतो. ग्रामीण भागात शेतावर जाण्यासाठी, शेतमालाची ने-आण करण्यासाठी किंवा रोजच्या प्रवासासाठीही होऊ शकतो. ३०० किलो वजन वाहून नेण्याची या गाडीची क्षमता आहे. ही गाडी अपंगांनाही साहाय्यकारी ठरू शकते.
संघातील विद्यार्थी – थॉमस टॉम, जोआन्ना जॉय, अ‍ॅलन डिसुझा, थॉमस चाको, श्रुती लोकनाथन, विष्णू नारायण आणि लिजो जॉयकुट्टी

सौर वातानुकूलन
‘मुकेश पटेल स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट’च्या विद्यार्थ्यांनी सौर ऊर्जेवर चालणारे वातानुकूलन यंत्र तयार केले आहे. पेल्टिअर अथवा थर्मोइलेक्ट्रिक इफेक्ट म्हणजेच औष्णिक ऊर्जेवर चालणारे हे वातानुकूलन यंत्र आहे. छोटय़ाशा प्लास्टिकच्या पेटीत पाणी भरून त्यात ठेवलेल्या आणि सौर ऊर्जेवर चालणाऱ्या सर्बियन पंपाद्वारे या पंपाखाली बसवलेल्या प्लेटिअर प्लेटचा वापर करून छोटय़ाशा एक्झॉस्ट पंख्याने कंडेन्सर कॉइलवर हवेचा झोत टाकून हेवेतील उष्णता कमी करण्यात येते. या यंत्राच्या खाली दिलेले बटण सरकवले, तर पेल्टिअर प्लेट उलट पद्धतीने काम करते आणि हिवाळय़ासाठी हवा गरम करू शकते. सौर ऊर्जेवर चालणाऱ्या आणि अत्यंत कमी खर्चात व वातावरणाचे नुकसान न करता हरित तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेल्या या यंत्राचा वापर भाज्या किंवा फळे वाहून नेणाऱ्या ट्रक्समध्ये करता येऊ शकतो. या यंत्राला द्वितीय पारितोषिक मिळाले आहे.
संघातील विद्यार्थी – पार्थ व्होरा, प्रतिक पांचाळ, पार्थ शाह आणि पलाश शाह.

वीजेशिवाय चालणारा पंप
तृतीय पारितोषिक विजेत्या संघाने दोन प्रकल्प सादर केले. यातील एका प्रकल्पात विजेशिवाय चालणारा पाणी उपसायचा पंप, तर दुसऱ्या प्रकल्पात पायाने चालवायच्या शिवणयंत्राचा वापर करून वीज तयार करायचा अनोखा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांना सर्वाधिक कल्पक प्रकल्पाचा मानही मिळाला. या दोन्ही प्रकल्पांमध्ये त्यांनी लोलकाचा वापर केला होता. एका लोखंडी दांडय़ाला पुरेशी वजने लावून त्याचा लोलकाप्रमाणे वापर करून पंपाचा भाता हलवला की, पंपाने पाणी उपसता येऊ शकते, हे या विद्यार्थ्यांनी दाखवून दिले. त्यामुळे विजेचा वापर टाळून पंपावरचा खर्च कमी झाला की, आपल्या घरासभोवतालच्या बागेला पाणी देता येणे सहज शक्य होईल. पण याचा विशेष उपयोग होईल, तो ग्रामीण भागांमध्ये शेतीकरता, जिथे वीजेच्या भारनियमनामुळे पंप चालवता येत नाहीत. शिवणयंत्रालाही याच लोलकाचा वापर करून दिलेल्या गतीमुळे त्याला जर जनरेटर जोडला, तर लोलकावर चालणाऱ्या जनरेटरमधून कशाप्रकारे वीजनिर्मिती होऊ शकते. पाण्याचा पंप अवघ्या तीन हजारांत, तर वीज तयार करायचे यंत्र अवघ्या १३ हजारात तयार होऊ शकते.
संघातील सदस्य – जतन देसाई, हर्षलि पाडिआ, अमेय पटेल आणि विनय सावंत