सेवानिवृत्तीनंतर निधन झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना देण्यात येत असलेले निवृत्ती वेतन प्रशासनाने तडकाफडकी बंद केले असून त्यांना चुकीने दिले गेलेले निवृत्तीवेतन एकरकमी वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे. एकरकमी दीड ते दोन लाख रुपये भरण्याची नोटीस पालिकेने बजावल्यामुळे या कुटुंबांपुढे ऐन दिवाळीत तारे चमकायची वेळ आली आहे. प्रशासनाच्या तुघलकी कारभारामुळे या ४२० कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांची घरे मात्र अंधारमय झाली आहेत. पालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचे निधन झाल्यानंतर त्याला मिळणारे निवृत्तीवेतन त्याच्या वारसाला मिळते. मात्र पालिकेच्या सेवेतून निवृत्त झालेल्या आणि १ जुलै २००५ ते २६ फेब्रुवारी २००९ या कालावधीत निधन झालेल्या ४२० कर्मचाऱ्यांच्या वारसांना दिले जाणारे कुटुंब निवृत्ती वेतन दोन महिन्यांपासून अचानक बंद करण्यात आले. इतकेच नव्हे तर त्यांना दिलेले निवृत्तीवेतन परत करावे, अशा आशयाच्या नोटिसाही त्यांच्यावर बजावल्या आहेत. नोटीस हातात पडताच या कुटुंबियांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. आधीच अचानक निवृत्ती वेतन बंद झाल्यामुळे ही कुटुंबे अडचणीत आली होती. त्यात पैसे परत करण्याची नोटीस आल्याने ही कुटुंबे उपासमारीच्या खाईत ढकलली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.राज्य सरकारच्या एका परिपत्रकाचा दाखला देऊन पालिका प्रशासनाने या कुटुंबियांना एकरकमी दीड ते दोन लाख रुपये परत करावेत, अशा आशयाची नोटीस त्यांच्यावर बजावली आहे. राज्य सरकारच्या परिपत्रकानुसार निवृत्ती वेतनाची रक्कम परत वसूल करावयाची असेल तर पालिका प्रशासनाने सरकारनुसार सहावा वेतन आयोगही लागू करावा, अशी मागणी कर्मचारी करू लागले आहे. कुटुंब निवृत्ती वेतन रोखून ४२० कुटुंबियांची अडवणूक केल्याबद्दल पालिका कर्मचारी संतप्त झाले आहेत.
चुकीने दिलेली जादा रक्कम
परत घेणार – अडतानी
या कुटुंबियांना चुकून अधिक निवृत्ती वेतन देण्यात आले होते. ती रक्कम परत घेण्यात येत आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त मोहन अडतानी यांनी दिली.
‘अंशराशीकरणा’वरून गोंधळ
निवृत्त कर्मचाऱ्याच्या निवृत्ती वेतनातील एकतृतियांश भाग ‘अंशराशी’त जमा केला जातो. ठरावीक कालमर्यादेनंतर ही रक्कम संबंधित निवृत्ती कर्मचाऱ्याला मिळते. परंतु तत्पूर्वी संबंधित कर्मचाऱ्याचे निधन झाले तर ती रक्कम त्याच्या नातेवाईकांना मिळते. परंतु याही रकमेचा घोळ प्रशासनाने घातला असून निवृत्तीनंतर मरण पावलेल्या कर्मचाऱ्यांचे वारस या रकमेपासून वंचित राहिले आहेत.