बेलापूर येथील नवी मुंबई पालिकेचे जुने मुख्यालय सोडताना अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांचे डोळे अक्षरश: पाणावले. अनेकांच्या जीवनातील सुख-दु:खाची साक्षीदार असणाऱ्या या वास्तूतच बहुतांशी कर्मचाऱ्यांनी आयुष्यातील पहिली निमसरकारी नोकरी पत्करली. याच इमारतीत अनेकांना पदोन्नती मिळाली. त्यामुळे जुने घर सोडताना निर्माण होणारे दु:ख ही इमारत सोडताना झाल्याची भावना अधिकारी, कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. 

विस्तीर्ण अशा नवीन मुख्यालयात माणूस हरवून जाण्याची भीतीदेखील काही जणांनी व्यक्त केली. नवी मुंबई पालिकेच्या नवीन आलिशान मुख्यालयात मंगळवारपासून पूर्ण वेळ कामकाज स्थलांतरित झाले. त्यासाठी १० एप्रिलपासून स्थलांतराची प्रक्रिया सुरू होती. शनिवारपासून मिळालेल्या तीन दिवसांच्या सुट्टीत संगणकीय स्थलांतर पार पडले. गुरुवारपासून टप्याटप्याने सुरूझालेले कामकाज मंगळवारपासून खऱ्या अर्थाने सुरू झाले. अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आपल्या आयुष्याची पहिली नोकरी या इमारतीतून सुरू केलेली आहे. त्यामुळे एक भावनिक नातेसंबंध या वास्तूबरोबर तयार झाल्याचे उपायुक्त जगन्नाथ सिन्नरकर यांनी सांगितले.
पालिकेचे पहिले आयुक्त एम. रमेशकुमार यांनी मुलाखत घेऊन सिन्नरकर यांना सहाय्यक आयुक्त म्हणून नियुक्त केले होते. भारतीय नौसेनेतील सेवा पूर्ण केल्यानंतर सिन्नरकर पालिकेत जनसंपर्क अधिकारी म्हणून रुजू झाले होते. त्यानंतर याच वास्तूत त्यांना उपायुक्त पदापर्यंत पदोन्नती मिळाली. आयुष्याची २२ वर्षे या इमारतीत दवडल्याने सिन्नरकर दालन सोडताना गहिवरले. कोणत्याही प्रकारची भेटण्यासाठी चिठ्ठी पद्धत न अवलंबता सिन्नरकर यांच्या दालनात कोणालाही प्रवेश करता येत होता, ही सिन्नरकर यांच्या दालनाची खासियत मानली जात होती. ‘छोटे दालन मुक्त दालन’, अशी त्यांच्या दालनाची ओळख होती. चार मजल्याच्या इमारतीत सर्व पदाधिकारी, अधिकाऱ्यांना सामावून घेताना अधिकाऱ्यांना छोटी दालने पदरात पडली होती. नवीन इमारतीतील दालने ही भव्य आहेत. अनेक मोठय़ा प्रकल्पांना आठ मजल्याच्या या इमारतीत मृत स्वरूप मिळाले.
याच इमारतीने आतापर्यंत चार पालिकेच्या सार्वत्रिक इमारती पाहिल्या. छोटी वास्तू होती तरी सर्वाना सामावून घेणारी वाटत होती. त्यामुळे पहिले घर सोडताना जे दु:ख वाटते तसे ही इमारत सोडताना चार दिवसांपासून वाटत होते. वास्तू म्हणजे नसतात केवळ भिंती, खिडक्या, दारे तर वास्तूने बघितलेले असते व्यक्तिमत्त्व घडणारे. अशा शब्दात जनसंपर्क अधिकारी व कवी महेंद्र कोंडे यांनी आपली भावना व्यक्त केली तर या इमारतीत कधी मनावर दडपण आले नाही, असे विकास कांबळे या कर्मचाऱ्याने सांगितले. बेलापूर भवनच्या या इमारतीत कोकण रेल्वेचे मुख्यालयदेखील आहे. त्यामुळे एक शेजारी दुरावल्याची भावनादेखील काही कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर होती. पािलकेचे चार मजले आपल्याला भाडय़ाने मिळावेत यासाठी कोकण रेल्वेने प्रयत्न सुरू केले आहेत.