पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘स्वच्छ भारत अभियाना’अंतर्गत अवघ्या मुंबईत झाडलोट सुरू असताना मढ चौपाटी मात्र दुर्लक्षित राहिली आहे. एके काळी रुपेरी वाळूचे दर्शन घडविणाऱ्या या चौपाटीमध्ये सध्या मासळीच्या वाळवणाचे अतिक्रमण आणि दरुगधीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे पर्यटकांनीच नव्हे, तर मढ आणि आसपासच्या गावांतील ग्रामस्थांनीही या चौपाटीकडे पाठ फिरविली आहे. मढ चौपाटीवरील म्युनिसिपल प्राथमिक शाळेलाही मासळी वाळवण आणि मासळीच्या जाळ्यांच्या गराडय़ात अडकली आहे; पण जिल्हाधिकारी अथवा स्थानिक लोकप्रतिनिधींचे या चौपाटीकडे लक्षच नाही.
कोजागरी पौर्णिमा असो किंवा नववर्षांची पूर्वसंध्या, साधारण १५ वर्षांपूर्वी मढ आणि भाटी गावालगतची चौपाटी पर्यटकांच्या गर्दीने फुलून जात होती. शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सहली तर नित्याचीच बाब होती. सुरक्षित आणि सुंदर समुद्रकिनारा अशीच मढ चौपाटीची ओळख होती; परंतु गेल्या mv03काही वर्षांपासून मढ चौपाटीची ही ओळख पुसली गेली आहे. मुंबई आणि आसपासच्या बंदरांवरून मोठय़ा प्रमाणावर ओली मासळी ट्रकमधून या चौपाटीवर वाळवणासाठी आणली जात आहे. मात्र काही दलाल आणि व्यापाऱ्यांनी या चौपाटीचा ताबाच घेतला आहे. चौपाटीवर सर्वत्र प्लास्टिक पसरून त्यावर मासळी वाळत घालायला सुरुवात केली आहे. तसेच बांबू रोवून त्यावर बोंबील वाळविण्यात येत आहेत. मढ आणि आसपासच्या गावांतील विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षण मिळावे म्हणून महापालिकेने मढ चौपाटीवर एका बाजूला म्युनिसिपल मराठी प्राथमिक शाळा सुरू केली. मात्र शाळेचा आवारही मासळीच्या वाळवणापासून सुटलेला नाही. सुकत पडलेली मासळी आणि मासेमारीवरून परतलेल्या मच्छीमारांची जाळी शाळेच्या आवारात कायम ठेवलेली असतात. हा प्रकार गेल्या १५ वर्षांपासून सुरू झाला आहे. गावठाणाच्या दोन्ही बाजूंनी १०० मीटर अंतरापर्यंत मासळी वाळवणासाठी परवानगी आहे; परंतु हळूहळू संपूर्ण चौपाटीवर वाळवणाचे साम्राज्य पसरले असून त्याकडे कुणाचेच लक्ष नाही.
एके काळी या चौपाटीवर मोठय़ा संख्येने पर्यटक येत होते. त्यामुळे अनेक ग्रामस्थांना रोजगारही उपलब्ध झाला होता; पण कालौघात वाळवणासाठी मोठय़ा प्रमाणावर येऊ लागलेल्या ओल्या मासळीमुळे केवळ चौपाटीवरच नव्हे, तर मढ आणि भाटी गावांतही दरुगधी पसरू लागली आणि त्याला कंटाळून पर्यटकांनी या चौपाटीकडे पाठ फिरविली. पर्यटनाच्या निमित्ताने उपलब्ध झालेला रोजगार बुडू लागल्याने त्यावर अवलंबून असलेल्यांना रोजीरोटीसाठी अन्यत्र धाव घ्यावी लागली आहे.
केवळ पावसाळ्यात या चौपाटीला वाळवणापासून मुक्ती मिळते; पण पावसाळ्यात समुद्राला येणाऱ्या उधाणामुळे चौपाटीवर जाणे अवघड बनते. पावसाळा संपल्यानंतर तात्काळ मासळी वाळविण्यासाठी पथाऱ्या पसरल्या जातात आणि गावभर दरुगधीचे साम्राज्य पसरते. या चौपाटीला पूर्वीप्रमाणे स्वच्छ, सुंदर रूप यावे आणि पुन्हा एकदा पर्यटकांच्या गर्दीने समुद्रकिनारा फुलून जावा असे अनेकांना वाटत आहे. परवानगीनुसार मर्यादित जागेत मासळीचे वाळवण घातले गेले तर हे सहज शक्य आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी या प्रश्नाकडे लक्ष देण्याची गरज आहे, तरच मढची चौपाटी मोकळा श्वास घेऊ शकेल आणि पुन्हा एकदा पर्यटकांच्या गर्दीने फुलेल.