पालिकेच्या एस प्रभागाचे उपअभियंते सुनीलकुमार दशरथ सिंग यांना लाचखोरीच्या प्रकरणात दोषी ठरल्याने शहर सत्र न्यायालयाने ३ वर्ष कारावास आणि दंडाची शिक्षा सुनावली आहे. एका ठेकेदाराकडून ५० हजारांची लाच घेतल्याप्रकरणी सिंग यांना लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाने अटक केली होती.
या प्रकरणातील फिर्यादीचा फायबर केबल मेन्टेनन्सचा व्यवसाय आहे. कांजूर येथे पाइपमधून केबल वायर टाकण्यासाठी त्यांनी उपअभियंता सिंग यांच्याकडे परवानगी मागितली होती. त्या मोबदल्यात सिंग यांनी दीड लाखांची लाच मागितली होती. त्यातील ५० हजार रुपये घेत असताना सिंग यांना लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाने अटक केली होती. या प्रकरणी खटला पूर्ण होऊन सिंग दोषी आढळले होते. शहर सत्र न्यायालयातील विशेष न्यायालयाने सिंग यांना दोन कलमांअंतर्गत दोषी ठरवत एकूण ३ वर्ष सश्रम कारावास आणि १५ हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास सहा महिने साध्या कैदेची शिक्षा सुनावली आहे.