अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या प्रवेश संख्येबाबत जाहीर केलेल्या नव्या यादीला उच्च व तंत्रशिक्षण विभागाने मान्यता दिली आहे.
 विदर्भातील शेगाव येथील माऊली ग्रुप ऑफ इन्स्टिटय़ूशन्सच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी आणि वाशीम येथील सन्मती कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग या दोन्ही संस्थांची प्रवेश क्षमता कायम ठेवली आहे.
पूर्वीच्या निर्णयात माऊली ग्रुप ऑफ इन्स्टिटय़ूटमधील चार शाखांची प्रवेश संख्या ७५ ने कमी करण्यात आली होती, तर सन्मती कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधील पाच शाखांची प्रवेश संख्या १५० ने कमी झाली होती.

सुधारित शासन निर्णयात आता या दोन्ही अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या जागा जैसे थे ठेवण्यात आल्याचे नमूद आहे.
शेगाव येथील माऊली ग्रुप ऑफ इन्स्टिटय़ूटच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अ‍ॅन्ड टेक्नॉलॉजीमधील कॉम्प्युटर सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी शाखेच्या ६०, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या ६०, इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकेशनच्या १२० तर मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या ६० जागा कायम ठेवण्यात आल्या आहेत.
वाशीम जवळील सावरगाव बर्डे येथील सन्मती कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या सिव्हिल इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर सायन्स, ईलेक्ट्रिकल, ईलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकेशन तसेच मेकॅनिकल इंजिनिअरिंग या शाखांच्या प्रत्येकी ६० प्रवेश संख्या कायम ठेवण्यात आली आहे.