साखर कामगार आणि राज्य परिवहन कर्मचाऱ्यांना ईपीएफ ९५ अंतर्गत मिळणारे निवृत्ती वेतन अतिशय तुटपुंजे असून खा. होशियारी समितीच्या शिफारसींना मंजुरी देण्याच्या मागणीसाठी २० नोव्हेंबर रोजी ईपीएफअंतर्गत निवृत्तीधारकांचा मोर्चा काढण्यात येणार आहे.
साखर कामगारांना ईपीएफ ९५ अंतर्गत दरमहा ३०० ते १५०० रुपयांपर्यंत वेतन मिळते. महागाईभत्ता मिळत नाही. या योजनेंतर्गत दर १० वर्षांनी निवृत्ती वेतनाचा आढावा घेण्याची तरतूद असताना केंद्र शासन निर्णय घेत नाही. यासंदर्भात खा. होशियारी समितीने राज्यसभेत अहवाल सादर केला आहे. त्यात दरमहा तीन हजार रुपये व महागाईभत्ता देण्याची तरतूद आहे. त्यास शासनाने मंजुरी देऊन देशातील ४४ लाख निवृत्ती वेतनधारकांना त्वरित लाभ देण्याच्या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे. नाशिक जिल्ह्य़ातील साखर कामगारांनी बुधवारी दुपारी १२ वाजता शालिमार येथील बी. डी. भालेकर मैदानापासून निघणाऱ्या मोर्चात मोठय़ा संख्येने सहभागी होण्याचे आवाहन साखर कामगार नेते प्रकाश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत करण्यात आले. याप्रसंगी पेन्शनर फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष राजू देसले, विष्णुपंत गायखे यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी शिवाजी शिंदे, भास्कर कापडणीस, प्रताप देवरे, प्रकाश दुसाणे, एकनाथ पवार, देवराम वारूंगसे, निवृत्ती वाघ, दीपक रोकडे, वसंत भामरे आदी उपस्थित होते.
दरम्यान, या मोर्चात राज्य परिवहन महामंडळाच्या सेवेतून निवृत्त झालेले कर्मचारी सहभागी होणार आहेत. राज्य परिवहनच्या नाशिक विभागातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन विभागीय अध्यक्ष रांगणेकर, विभागीय सचिव सुधाकर गुजराथी, राजाभाऊ जाधव, एकनाथ लहामगे, प्रकाश दुसाणे, कृष्णा शिरसाठ आदींनी केले आहे.