वीजवापर शून्य असतानाही शेतकऱ्यांना सप्टेंबरमधील वीज देयके अंदाजे व प्रचंड रकमेची देण्यात आली. अशा शेतकऱ्यांनी भरपाईसाठी नाशिक जिल्हा ग्राहक पंचायतीकडे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्ह्य़ात यंदा जून ते ऑक्टोबर या कालावधीत पाऊस चांगला झाल्याने शेतीसाठी वीजवापर शून्य युनिट झाला. असे असतानाही सर्व शेतकऱ्यांना वीज वितरण कंपनीने जून ते सप्टेंबरची अंदाजे व प्रचंड रकमेची देयके दिली. तीन अश्वशक्तीची वीज मोटार असणाऱ्या शेतकऱ्यांना सरसकट पाच अश्वशक्तीच्या वीज मोटारीची देयके म्हणून ३५०० ते ४५०० रुपये अशी अंदाजे देयके दिंडोरी, निफाड, इगतपुरी, चांदवड, दरी, मातोरी, शिवनई, महिरावणी, चांदोरी, सायखेडा, कोऱ्हाटे या गावांमध्ये वाटप करण्यात आली. ही देयके न भरल्यास वीजजोडणी कोणतीही कायदेशीर लेखी नोटीस न देता बंद करण्याची कारवाई वीज कंपनीने सुरू केली.
वीज कायदा २००३ आणि वीज ग्राहकांसाठी अटी व शर्ती २००५ यानुसार कृषी पंपासाठी वीज मीटर वाचनानुसार योग्य देयक न दिल्यास अंदाजे देयके रद्द करून त्यासाठी वीज कायदा २००३ नुसार प्रतिमाह ४०० रुपये भरपाई ग्राहकास द्यावी, अशा प्रकारची अंदाजे देयके रद्द करून नुकसानभरपाई म्हणून प्रतिमाह ४०० रुपयेप्रमाणे भरपाई द्यावी, असे तक्रार अर्ज भरून सविनय कायदे पालन व अंदाजे देयके रद्द मोहीम ६ नोव्हेंबरपासून नाशिक जिल्हा ग्राहक पंचायतीचे विलास देवळे, कृष्णा गडकरी यांनी दरी, मातोरी भागातून ग्राहकांचे अर्ज भरून सुरू केली आहे. अर्ज दिल्यानंतर कायद्याने हक्क राखून ३०० रुपये भरता येतात. उर्वरित वादग्रस्त देयकांकरिता वीजपुरवठा खंडित होत नाही. तसेच भरपाई ४०० रुपये प्रतिमाह मिळते. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना वीज वाचन नसतानाही जून ते सप्टेंबरची वीज देयके अंदाजे आली आहेत. त्यांनी अर्ज १५ दिवसांच्या आत भरावे व त्याची प्रत नाशिक जिल्हा ग्राहक पंचायतीस द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ९४२२२६६१३३, ९४२१९१७३६४ या क्रमांकावर संपर्क साधावा.