कोणतीही वैद्यकीय पदवी नसताना अनधिकृत गर्भपात केंद्र चालवून अनेक ‘नकोशीं’ ना संपवणाऱ्या शेख अरीफा बेगम खुदाबक्ष (वय ४०) या महिलेला विमानतळ पोलिसांनी मंगळवारी ताब्यात घेतले.
शहराच्या बजरंग कॉलनी परिसरात राहणारी ही महिला काही वर्षांपूर्वी एका रुग्णालयात परिचारिका होती. नोकरी सोडल्यानंतर तिने चक्क अनधिकृत गर्भपात केंद्र सुरू केले. प्रशासन कायद्याचा बडगा उगारत असल्याने बहुतांश वैद्यकीय अधिकारी गर्भिलग निदान वा गर्भपात या पासून दूर राहात आहेत. मात्र, याचाच फायदा घेत अरीफा बेगमने राहत्या घरीच गर्भपात केंद्र सुरू केले. गेल्या २-३ वर्षांत शेकडोंनी गर्भपात तिने घडवून आणल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
बजरंग कॉलनीतील ‘नकोशी’ ला संपवणाऱ्या या उद्योगाची कुणकुण लागल्यानंतर विमानतळ पोलीस ठाण्याचे निरीक्षक धरमसिंग चव्हाण यांनी सापळा रचला. एका ३० वर्षीय महिलेच्या साडेचार महिन्यांच्या ‘नकोशी’ चा गर्भपात केला जात असताना पोलिसांनी अरीफा बेगमला रंगेहाथ पकडले. पोलिसांच्या छाप्यात तेथे गर्भपातासाठीची औषधे, इंजेक्शन, पॅड, रक्तस्राव थांबवण्यासाठीच्या गोळ्या व सलाईनचा मोठा साठा जप्त करण्यात आला. कोणतीही वैद्यकीय पदवी नसताना अरीफा बेगमचा उद्योग गेल्या अनेक वर्षांपासून निर्धोक सुरू असला, तरी परिसरात कोणालाही त्याची साधी गंधवार्ताही नव्हती, हे विशेष. उलट परिसरात राहणाऱ्या अनेक नागरिकांना ती डॉक्टर असल्याचे भासवत होती, अशी माहिती पोलिसांनी दिली.
शासकीय रुग्णालयातील निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. उत्तम इंगळे यांच्या तक्रारीवरून अरीफा बेगमविरुद्ध विमानतळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला.