मुसळधार पावसात शहरातील अंतर्गत रस्त्यांवर पाण्याचा योग्य प्रकारे निचरा होत असताना महापालिकेने मोठा गाजावाजा करत एक्स्प्रेस हायवेच्या धर्तीवर उभारलेल्या मोठय़ा रस्त्यांवर पावसाची तळी साचू लागल्यामुळे या रस्त्यांच्या बांधणीविषयी आता प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. तुर्भे ते दिघा दरम्यान उभारण्यात आलेल्या ठाणे-बेलापूर रस्त्यावर यंदाच्या पावसाळ्यात मोठय़ा प्रमाणावर तळी साचू लागली असून पालकमंत्री गणेश नाईक यांचा वावर असणाऱ्या बोनकोडे गावासमोरील व्हाइट हाऊसलगतच्या रस्त्यावर तर साचलेल्या पाण्यामुळे दिवसभरात चार वाहनांच्या टक्करी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. सिडकोने उभारलेल्या बहुचर्चित पाम बीच मार्गावरही जागोजागी पाणी साचू लागले आहेत. या रस्त्यांची उतरण योग्य प्रकारे ठेवण्यात आली नसल्यामुळे पावसाळ्यात हे रस्ते अपघातांना निमंत्रण ठरू लागल्याचे वाहतूक पोलिसांचे म्हणणे आहे.
जून महिन्याच्या सुरुवातीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे नवी मुंबईतील रस्त्यांवर जागोजागी खड्डे पडले असले तरी पावसाचे पाणी फारसे कुठे साचलेले नाही. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा नालेसफाई चांगली झाल्याचा दावा महापालिकेमार्फत सातत्याने केला गेला आहे. शहरातील खोलगट भागातही यंदाच्या पावसाळ्यात फारसे पाणी साचल्याच्या तक्रारी पुढे आलेल्या नाहीत. एकीकडे हे दिलासादायक चित्र दिसत असले तरी शहरातील मोठय़ा मार्गावर पाण्याची तळी साचू लागल्याने अभियांत्रिकी विभागाच्या कामाविषयी प्रश्नचिन्हे उपस्थित केली जात आहेत. ठाणे-बेलापूर रस्त्याच्या कामाविषयी सुरुवातीपासूनच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. या रस्त्याचे काम फारसे दर्जात्मक झालेले नाही, अशा स्वरूपाचे आक्षेप घेण्यात आले आहेत. या पाश्र्वभूमीवर यंदाच्या पावसाळ्यात या रस्त्यावर पाणी साचण्याचे प्रमाण वाढल्यामुळे वाहन चालकांना येथून वाहने चालविताना मोठय़ा प्रमाणावर त्रास होऊ लागला आहे. नवी मुंबई महापालिकेने बोनकोडे परिसरात ठाणे-बेलापूर रस्त्याला वळसा घेणाऱ्या उड्डाणपुलाची नुकतीच उभारणी केली आहे. हा उड्डाणपूल ठाणे-बेलापूर औद्योगिक पट्टय़ात जाणाऱ्या वाहनांसाठी उभारण्यात आला आहे. असे असले तरी या पुलाच्या उभारणीमुळे ‘व्हाइट हाऊस’समोरील रस्त्यावर पाण्याचे मोठे डबके निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे. पावसाचा जोर वाढताच या ठिकाणी पाणी तुंबते आणि त्यामुळे ठाणे-बेलापूर रस्त्यावरील वाहतुकीचा खोळंबा होत असल्याचे चित्र दिसत आहे. तळवली गाव, ऐरोली सब-वे, चिंचपाडालगत असलेल्या रस्त्यावरही जागोजागी पाणी साचत असल्याने वाहतुकीत अडथळे निर्माण होत आहेत. सुमारे १४० कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या या रस्त्याचा उतार व्यवस्थित ठेवण्यात आला नसल्यामुळे पाणी साचत असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहे. पाम बीच मार्गावरही जागोजागी पाणी साचू लागल्यामुळे द्रुतगती मार्ग सतत तुंबू लागल्याचे चित्र दिसू लागले आहे.