गेल्या काही वर्षांच्या रेल्वे अर्थसंकल्पांवर दृष्टिक्षेप टाकला तर रेल्वे प्रशासन ठाणे पलीकडील उपनगरी प्रवाशांच्या समस्यांविषयी एकतर अनभिज्ञ आहेत किंवा ते प्रश्न सोडविण्याबाबत उदासीन तरी आहेत, असेच म्हणावे लागेल. ठाणे-कसारा/कर्जत मार्गावरील वाढत्या प्रवाशांच्या सोयीसाठी तीन वर्षांपूर्वी घोषित शटल सेवा रेक उपलब्ध नसल्याने अद्याप धडपणे सुरू होऊ शकलेली नाही. अशा परिस्थितीत पुढील महिन्यात ठाणे स्थानकात पुढील महिन्यात सरकते जिने कार्यान्वित करण्याची घोषणा करून रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. प्राथमिक सुविधांचा अभाव असताना अद्ययावत सुविधांचा सोस कशासाठी, असा प्रवाशांचा रोखठोक सवाल आहे. सरकत्या जिन्यांआधी ठाणे पलीकडच्या प्रवाशांच्या सोयीसाठी अतिरिक्त गाडीची आवश्यकता आहे.
ठाण्याहून वाशी-पनवेल मार्गावर सध्या दहा-पंधरा मिनिटांनी उपनगरी सेवा सुरू आहे. त्यामुळे साहजिकच ठाणे स्थानकातील प्रवाशांची गर्दी कैकपट वाढली आहे. तिसरा पूल कार्यान्वित झाल्यानंतर दोन्ही पुलांवरील गर्दी फारशी कमी झाली नाहीच, उलट नव्या पुलामुळे गर्दीच्या वेळी फलाटावर प्रवाशांना उभे राहायलाही जागा नसते. त्यात आता सरकत्या जिन्यांची भर पडणार आहे. भारतातील सर्व प्रांतात गाडय़ा जाऊ शकणारे कल्याण हे देशातील महत्त्वाचे जंक् शन आहे. पूर्वी या स्थानकातून कर्जत तसेच कसारा मार्गावर शटल स्वरूपाची सेवा सुरू होती. मध्यंतरी ती बंद करण्यात आली. ठाण्याहून शटल सेवा सुरू करणे शक्य नसेल तर किमान कल्याणची शटल सेवा पूर्ववत सुरू करावी, अशी प्रवासी संघटनांची मागणी आहे.
कल्याण पल्याड कसारा तसेच कर्जत या दोन्ही मार्गावरील शहरांमध्ये झपाटय़ाने निवासी तसेच औद्योगिक वसाहती वाढत आहेत. त्या जोडीनेच वांगणी-कर्जत तसेच आसनगांव परिसरातील महाविद्यालयांमध्ये मुंबई, नवी मुंबई, ठाणे परिसरातून हजारो विद्यार्थी रोज ये-जा करू लागले आहेत.
सध्या तरी या प्रवाशांना रेल्वेशिवाय दुसरी कोणतीही पर्यायी वाहतूक व्यवस्था नाही. भविष्यातही मुंबईपेक्षा या भागातील लोकवस्ती आणि पर्यायाने प्रवाशांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे ठाणे पल्याडच्या प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे प्रशासनाने तातडीने रेक उपलब्ध करून देणेच प्रवाशांच्या हिताचे ठरणार आहे.