चंद्रपूर जिल्ह्य़ातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प हे राज्यातील पर्यटकांच्या आकर्षणाचे मोठे केंद्र आहे. त्यामुळे पर्यटकांची संख्या वाढतच असणार, या सर्वाच्याच समजाला धक्का देणारी आकडेवारी हाती आली आहे. जंगलाचे भूषण असलेल्या वाघाचे अनेकदा दर्शन होत असल्यामुळे अनेकांची येथे धाव असते, तरीही गेल्या पाच वर्षांत पर्यटकांची संख्या घटल्याची आकडेवारी खुद्द वनविभागानेच दिली आहे.
गेल्या २००९-१० साली १ लाख ३ हजार ६९६ पर्यटकांनी ताडोबाला भेट दिली होती. पुढच्या वर्षी ही संख्या ७८ हजार ८८१ इतकी झाली. २०११-१२ साली हा आकडा ४७ हजार ६३५ इतकी घसरली. त्यानंतरच्या वर्षी ८६ हजार ५५७ पर्यटक ताडोबात आले. मात्र, गेल्या वर्षी (२०१३) पुन्हा यात घट होऊन त्यांची संख्या ७० हजार ६७८ इतकी झाली. या व्याघ्र प्रकल्पात आलेल्या वाहनांच्या संख्येतही असेच चढउतार दिसतात. २००९-१० साली १५ हजार ५९३ वाहने येथे आली. पुढील वर्षी हा आकडा १० हजार ९८३ आणि त्यानंतरच्या वर्षी ७ हजार १७७ इतका घसरला. २०१२-१३ साली त्यात काहीशी वाढ होऊन तो ११ हजार ५५३ इतका झाला. गेल्या वर्षी ११ हजार ३३ वाहनांची ताडोबात नोंद झाली.
पर्यटकांच्या संख्येत घट होण्याची कारणे काय असावीत, याबाबत वन्यजीव तज्ज्ञदेखील आश्चर्य व्यक्त करत आहेत. एक तर वाघ दिसण्याचे प्रमाण घटले नसून, ताडोबात हमखास वाघाचे दर्शन होत असल्याचा अनेकांचा अनुभव आहे. काही वर्षांपूर्वी वाघांची हत्या होण्याचे प्रकार घडल्यामुळे जंगलातील कोअर क्षेत्रात प्रवेशावर बंदी घालण्यात आली, त्याचा थोडाफार फरक पडला असावा, असा अंदाज आहे.
गेल्या वर्षी ताडोबा प्रकल्पासाठीचे प्रवेश शुल्क आणि वाहनांसाठीच्या शुल्कात वाढ करण्यात आली. त्यामुळे पर्यटक कमी होण्याची शक्यता होती. मात्र, तसेही झालेले नाही. ऑनलाईन बुकिंगची सोय होऊनही अनेकांना बुकिंग मिळत नसल्याचा अनुभव येतो. त्यामुळे पर्यटकांच्या संख्येत घट होण्याचे कारण काय, हे विश्लेषण केल्यानंतरच सांगता येईल, असे वन्यजीवतज्ज्ञ बंडू धोत्रे यांनी सांगितले. या संदर्भात प्रकल्पाच्या क्षेत्र संचालकांशी संपर्क साधला असता, आकडेवारीची पाहणी केल्यानंतरच याबाबत काही बोलणे शक्य होईल, असे ते म्हणाले. ज्याप्रकारे पर्यटक घटले, तशी ताडोबातील प्राण्यांच्या संख्येतही घट झालेली दिसते. व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्र संचालक कार्यालयाने अभय कोलारकर यांना दिलेल्या माहितीनुसार, २०१० साली येथे १४९ रानकुत्री, २२५ अस्वले, १७५२ रानडुक्कर, १६६९ चितळ, ११५१ सांबर, ५२१ हरणे, १११६ रानगवे, १९८ नीलगायी, ६७ चौशिंगे आणि तीन हजारांहून अधिक माकडे होती. त्यानंतर मात्र प्राण्यांच्या संख्येत घट झालेली दिसते. २०१३ अखेपर्यंत येथे ९७ रानकुत्री, १५२ अस्वले, ८२८ रानडुक्कर, १२६६ चितळ, ७५१ सांबर, ३१७ हरणे, ७३४ रानगवे, १५६ नीलगायी आणि ६७ चौशिंगे होते. २००५ साली येथे सुमारे अडीच हजार माकडे होती, पण सध्याची आकडेवारी देण्यात आलेली नाही. २००९ साली ताडोबात ४३ वाघ व २२ बिबट होते. मात्र, त्यानंतरच्या वर्षांतील आकडे वनविभागाने दिलेले नाहीत. त्यामुळे त्यांच्या संख्येत मोठी घट झाल्याची शंका येते. प्रत्यक्षात वाघांची संख्या वाढल्याचे वनविभागाने नेहमीच सांगितले असून, २०१३ साली ताडोबात ५० वाघ असल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.