कुर्डूवाडीजवळ सात-आठ सशस्त्र दरोडेखोरांनी वाटमारी करून मोटारसायकलस्वारांना लुटले. लुटताना एका शेतक ऱ्याचा चाकूने भोसकून खून केला तर अन्य दोघांना जखमी केले. नंतर दरोडेखोरांनी ४१ हजारांचा ऐवज बळजबरीने लुटून नेला. ही वाटमारी करण्यासाठी दरोडेखोरांनी रस्त्यावरून ऊसवाहतूक करीत निघालेल्या ट्रॅक्टरचालकाला धमकावत ट्रॅक्टर रस्त्यावर आडवा लावण्यास भाग पाडले व त्या आधारे वाहनांची वाटमारी केल्याचे आढळून आले. शनिवारी पहाटे दीडच्या सुमारास हा प्रकार घडला.
सौदागर शिवाजी कदम (रा. अंबाड, ता.माढा) असे दरोडेखोरांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या दुर्दैवी व्यक्तीचे नाव आहे. तर सागर रमेश वाणी (रा. बार्शी) व दत्ता भरत गायकवाड (रा. पाथरी, ता. बार्शी) यांचा जखमींमध्ये समावेश आहे.
या संदर्भात मृत सौदागर कदम यांचे चुलत बंधू मनोज महादेव कदम (रा. अंबाड) यांनी कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार या घटनेची माहिती अशी, की मृत सौदागर व मनोज कदम हे दोघे मध्यरात्रीनंतर उशिरा आपल्या मोटारसायकलवरून (एमएच ४५-५००४) मोहोळ येथून अंबाड येथे स्वत:च्या वस्तीकडे परत येत होते. परंतु कुर्डूवाडीपासून ११ किलो मीटर अंतरावर, अंबाडच्या अलीकडे काही अंतरावर सात-आठ सशस्त्र दरोडेखोरांनी ऊसवाहतुकीचा ट्रॅक्टर (एमएच ४५-२०१२) बळजबरीने अडवून ट्रॅक्टरचालक सोमनाथ काशीराम माने यास दमदाटी केली व ट्रॅक्टर रस्त्यावर आडवा उभा करण्यास भाग पाडले. ट्रॅक्टर रस्त्यावर उभा राहिल्याने रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा आला. त्याच वेळी मोटारसायकलवरून आलेल्या सौदागर कदम व मनोज कदम यांना सशस्त्र दरोडेखोरांनी थांबवत दमदाटी केली व मोटारसायकलची चावी काढून घेतली. मात्र या वेळी प्रतिकार केल्याने दरोडेखोरांनी सौदागर कदम यांच्या पोटात चाकू खुपसला. यात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर इतर वाहनधारकांनाही दरोडेखोरंनी अडवून लुटले. यात २६ हजार ५०० रुपयांची रोकड, पाच मोबाइल संच, एटीएम कार्ड, वाहन चालविण्याचे परवाने आदी सुमारे ४१ हजारांचा ऐवज दरोडेखोरांच्या हाती लागला. दरम्यान, घटनेची माहिती समजताच सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक राजेश प्रधान व अतिरिक्त पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी गुन्ह्य़ाच्या ठिकाणी भेट देऊन गुन्ह्य़ाच्या पद्धतीचे निरीक्षण केले. कुर्डूवाडी पोलीस या गुन्ह्य़ाचा तपास करीत आहेत.