सलग दोन दिवस पडलेला पाऊस व धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे शेकडो एकरावरील पिकांना फ टका बसला असून पेरणीने समाधानी असणाऱ्या शेतकऱ्यांपुढे आता अतिवृष्टीचे संकट उभे ठाकले आहे.
जुलैच्या पूर्वार्धात ९० टक्के पेरण्या झाल्याने जिल्ह्य़ात यावर्षी खरीप हंगाम बहरण्याची चिन्हे आहेत. यापूर्वी जुलैअखेपर्यंत पेरण्या लांबत असल्याची नोंद आहे. पण, यावर्षी जूनच्या पहिल्या आठवडय़ापासून ते आजतागायत सार्वत्रिक पाऊस झाला. मध्यंतरी उघाड झाल्याने त्याचा शेतकऱ्यांना पेरणीसाठी फोयदाच झाला. शेतीबाबत असे समाधानकारक चित्र असल्याने सुगीचे दिवस येण्याची स्वप्ने पाहणाऱ्या शेतकऱ्यांपुढे आता अतिवृष्टीचे संकट उभे ठाकले आहे. महिन्यभरात ३ हजार ३५६ मि.मि.पाऊस पडला. आजचीच नोंद १२० मि.मी. आहे. सर्वाधिक पाऊस झालेल्या हिंगणघाट-समुद्रपूर परिसरात अतिवृष्टीचा फ टका बसल्याने शेकडो एकरावरील पेरणी जलमय झाली. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार एकाचा बळी गेला आहे, तसेच ११४ हेक्टर कापूस, ५८ हेक्टर सोयाबीन व ३० हेक्टरवरील तुरीचे पीक नेस्तनाबूत झाले आहे. जिल्ह्य़ातील अन्य तालुक्यातही अतिवृष्टीने शेतकरी काळजीत पडल्याचे चित्र आहे.     
जिल्हा कृषी अधीक्षक बऱ्हाटे हे यासंदर्भात माहिती देतांना म्हणाले की, सुरुवातीलाच झालेली अतिवृष्टी चिंताजनक आहे. ९० टक्क्यांवर पेरण्या आटोपल्या. रोपे उगवली. पण, सातत्याने झालेला पाऊस या रोपांसाठी धोक्याचा ठरू शकतो. पाने पिवळी पडणे, बियाणे किंवा रोपे मातीत दबणे, मशागतीची कामे थांबणे, असे अडसर निर्माण होऊ लागले आहे.
जिल्हा बॅंकेपासून वंचित व राष्ट्रीयीकृत बंॅकोंनी कर्ज नाकारल्याने शेतकऱ्यांची यावेळी आर्थिकदृष्टया चांगलीच आफ त झाली होती. पण, पदरमोड करीत व प्रसंगी सावकाराकडून पैसे आणत शेतकऱ्यांनी पेरण्या आटोपल्या. पूर्वार्धात समाधानकारक पाऊस व पुरेशी उघाड पडल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फु लले होते. मात्र, गेल्या दहा दिवसातील वृष्टीने ते झाकोळले गेले आहे. सातत्याने झालेल्या वृष्टीने जिल्ह्य़ातील जलाशयांची पातळी उंचावली असून बहुतांश प्रकल्पाची दारे उघडण्यात आली आहेत. हा अतिरिक्त पाणीसाठा परिसरातील गावातल्या शेतीसाठी हानीकारक ठरू लागला आहे. जिल्ह्य़ातील पोथरा, उन्नयी, लालनाला, नांद, मदन, नांदगाव या धरणांची दारे पाण्याच्या विसर्गासाठी सातत्याने उघडली जात आहे. नांद धरणाच्या दोन दारातून होणारा पाण्याचा विसर्ग आज थांबविण्यात आला. पोथरा धरण पूर्ण भरले असून सांडव्यावरून २५ सें.मी.ने पाणी वाहत आहे. उन्नयीतून दोन सें.मी.ने पाणी वाहू लागले असून लालनाला प्रकल्पाची दोन दारे सतत उघडली जात आहे. हा पाणीसाठा शेतीसाठी मारक ठरू लागला. इतर जलाशयांमधेही लक्षणीय साठा झालेला आहे. नांद-५१ टक्के, बोर-२८, धाम-४७, पोथरा-१००, डोंगरगाव-७७, पंचधारा-६५, मदन-५५, उन्नयी-१००, लालनाला-४१, नांद-५१, वडगाव-७५, उध्व वर्धा-४०, कार-२९, निम्न वर्धा-४८, बेंबळा-११ व सुकळी ८७ टक्के, असा पाणीसाठा आहे. छोटे तलाव व लघु पाटबंधारे प्रकल्प ओसंडून वाहू लागले आहेत. तालुकानिहाय वर्धा- ४७३ मि.मि., सेलू-३५२, देवळी-४६६, आर्वी-३९०, आष्टी-३४८, कारंजा-३४३, समुद्रपूर-४७७ व हिंगणघाट-५७० मि.मी. अशी आजवरच्या पावसाची विक्रमी टक्केवारी आहे. यापूर्वी जुलैअखेरीस अशी पर्जन्यनोंद राहिल्याचा दाखला आहे. पीककर्जाअभावी घायकुतीस आलेल्या शेतकऱ्यांनी कशीतरी सोय करीत पेरण्या साधल्या. उमलत्या अंकूरांनी समाधानही दिले. पण, अविरत पाऊस चिंतेचे मळभ आणणारा ठरू लागला आहे. अतिवृष्टीने शेकडो हेक्टर पीकक्षेत्र वाया जाण्याचा काही तालुक्यातील अनुभव आता पावसाने विश्रांती न घेतल्याने जिल्हाभर दिसू लागला आहे.