News Flash

जिल्हाधिकाऱ्यांनी बोलविलेली बैठक शेतकऱ्यांनी उधळली

प्रस्तावित उजळआंबा-बाभळगाव औद्योगिक वसाहतीला जमीन देण्याबाबत शेतकऱ्यांनी पुन्हा विरोध दर्शवताना जिल्हाधिकाऱ्यांनी जमिनीचा भाव ठरविण्यास आयोजित केलेली बैठक उधळून लावली.

| May 30, 2013 01:59 am

जिल्हाधिकाऱ्यांनी बोलविलेली बैठक शेतकऱ्यांनी उधळली

प्रस्तावित उजळआंबा-बाभळगाव औद्योगिक वसाहतीला जमीन देण्याबाबत शेतकऱ्यांनी पुन्हा विरोध दर्शवताना जिल्हाधिकाऱ्यांनी जमिनीचा भाव ठरविण्यास आयोजित केलेली बैठक उधळून लावली. बैठकीनंतर संतप्त शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने करीत घोषणा दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात या वेळी मोठा पोलीस बंदोबस्त होता.
तीन वर्षांपूर्वी उजळआंबा-बाभळगाव औद्योगिक वसाहत प्रस्तावास राज्य सरकारने मंजुरी दिली. सुरुवातीपासून शेतकऱ्यांनी काळी व कसदार बागायती जमीन औद्योगिक वसाहतीसाठी देण्यास विरोध केला. मात्र, शेतकऱ्यांचा विरोध न जुमानता जमीन संपादनाची कारवाई महसूल प्रशासनाने सुरू केली. प्रस्तावित औद्योगिक वसाहतीची अधिसूचना व जमीन संपादनाबाबत जाहीर प्रकटन काढण्यात आले. त्या वेळी वसाहतीसाठी संपादित केल्या जाणाऱ्या जमिनीच्या मालकांनी अॅड. राजेंद्र सराफ यांच्यामार्फत आक्षेप दाखल केले. या आक्षेपावर सुनावणी न घेता जमीन मोजणीचे काम प्रशासनाच्या वतीने एप्रिलमध्ये पोलीस बंदोबस्तात सुरू करण्यात आले. परंतु उजळआंबा व बाभळगावच्या शेतकऱ्यांनी जमीन मोजणीस विरोध करून महसूल अधिकाऱ्यासह मोजणीदारांना शेतातून पिटाळले.
गेल्या आठवडय़ात जिल्हाधिकारी डॉ. शालिग्राम वानखेडे यांच्या दालनात उजळआंबा-बाभळगाव औद्योगिक वसाहत जमीन संपादनाबाबत बैठक झाली. जिल्हा प्रशासनाच्या वतीने ही बैठक सकारात्मक झाल्याचे सांगण्यात आले. परंतु बैठकीस एकही शेतकरी उपस्थित नव्हता. मात्र, प्रस्तावित औद्योगिक वसाहतीच्या आजूबाजूला जमीन खरेदी केलेले काही व्यापारी उपस्थित होते. त्यामुळे हा प्रकार शेतकऱ्यांची दिशाभूल करणारा आहे, असा आरोप पंचायत समिती सदस्या अंजली बाबर यांनी केला. या पाश्र्वभूमीवर बुधवारी जिल्हाधिकारी डॉ. वानखेडे यांनी जमिनीचे भाव निश्चित करण्यासंबंधात चर्चा करण्यास शेतकऱ्यांना पाचारण केले होते. परंतु यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी जमिनीचे भाव कसले ठरवता? आम्ही जमीन देणारच नाही, अशी भूमिका घेत जमीनसंपादनाबाबत काढलेली अधिसूचना रद्द करण्याची मागणी केली. त्यामुळे बैठकीत गोंधळ उडाला. जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ पोलीस अधीक्षकांना बोलावून घेतले. अधीक्षक संदीप पाटील फौजफाटय़ासह पोहोचले. या गोंधळात जमिनीचे भाव निश्चिताबाबत चर्चा झालीच नाही. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर पडल्यानंतर शेतकऱ्यांनी निदर्शने करीत घोषणा दिल्या. बैठकीला कॉ. विलास बाबर, अंजली बाबर, अशोक कांबळे, भीमराव मोगले, अशोक साखरे, परमेश्वर पुरी आदींसह मोठय़ा संख्येने महिला शेतकरी उपस्थित होत्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 30, 2013 1:59 am

Web Title: farmers foil collector meetting
टॅग : Midc
Next Stories
1 चिखलीकरच्या मालमत्तेचे घबाड
2 छत्रपती शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयास मान्यता
3 राष्ट्रीय एरोबिक स्पर्धेत औरंगाबादला १० पदके
Just Now!
X