डिसेंबर महिन्यात होणाऱ्या शिक्षक पात्रता (टीईटी) या परीक्षेचा अर्ज भरताना पुणे विद्यापीठाने राबविलेल्या विचित्र कार्यशैलीने भावी शिक्षक वेठीस धरले गेले आहेत. या परीक्षेसाठी करावयाच्या कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी एकदा एक आणि नंतर वेगळे असे निकष लावल्याने अर्जदार भरडले गेले. परिणामी, अर्ज भरण्यासाठी शहरासह ग्रामीण भागातील या अर्जदारांना नाहक मनस्ताप सहन करून हेलपाटे मारावे लागत आहेत.
‘टीईटी’ परीक्षेसाठी चार दिवसांपासून अर्ज तपासणीचे काम येथील शासकीय कन्या विद्यालयात सुरू आहे. परीक्षेसाठी आवश्यक कागदपत्रांच्या तपासणीचे काम या ठिकाणी केले जाते. शहराच्या मध्यवर्ती भागात असणाऱ्या तपासणी केंद्रावर शहरासह जिल्ह्यातील नांदगाव, मालेगाव, सटाणा, देवळा, मनमाड, धुळे आदी ठिकाणहून विद्यार्थी येत आहे. पुणे विद्यापीठाने या परीक्षा अर्ज भरण्याच्या प्रक्रियेची माहिती आपल्या संकेतस्थळावर दिली आहे. त्यात अर्जासोबत दहावी आणि बारावी परीक्षा उत्तीर्ण असल्याचे गुणपत्रक, छायाचित्र, शिक्षण घेत असलेल्या वर्षांचे किंवा पदवी उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र मागविले होते. या माहितीनुसार विद्यार्थ्यांनी अर्ज सादर करण्यास सुरुवात केली. त्याकरिता तीन-चार तास रांगेत प्रतीक्षा केल्यावर ऐनवेळी वर्तणूक प्रमाणपत्र, जातवैधता प्रमाणपत्र तसेच ओळखपत्राची मागणी करण्यात आली. मुळात, त्या कागदपत्रांचा पुणे विद्यापीठाच्या संकेतस्थळावर कोणताही उल्लेख नसल्याने अर्जदारांमध्ये गोंधळ उडाला. धुळे, नांदगाव, मालेगाव या ठिकाणाहून आलेल्या विद्यार्थ्यांनी वेळेवर या कागदपत्राची पूर्तता कशी करायची, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मुळात अर्ज सादरीकरणासाठी लागणारा वेळ आणि ऐनवेळी मागणी केलेल्या कागदपत्रांची पूर्तता यामुळे केंद्रावर काही काळासाठी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.
या केंद्रावर कागदपत्रांचे साक्षांकन नसल्याचा मुद्दा उपस्थित करत काही अर्ज बाजूला ठेवण्यात आले. या परिस्थितीचा फायदा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात साक्षांकनासाठी बसणाऱ्या विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांनी उचलला. साक्षांकनासाठी संबंधितांकडून १० ते २० रुपये घेण्यात आल्याची तक्रार अनेकांनी केली. या बाबत माहिती मिळताच मनसेच्या विद्यार्थी सेनेचे अजिंक्य गीते आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शासकीय कन्या विद्यालयात भेट दिली. तेथील अधिकाऱ्यांशी चर्चा करून जात प्रमाणपत्र सादर करण्यासाठी एक दिवसाची मुदत द्यावी, तोपर्यंत त्यांचे अर्ज स्वीकारून बाजूला ठेवा, अर्ज सादरीकरणासाठी नेमकी कुठली कागदपत्रे हवी आहेत, त्याचा फलक लावावा, अशी मागणी परिसरात लावण्याची मागणी गीते यांनी केली. अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांकडून अर्ज स्वीकारण्यास सुरुवात केली असून कागदपत्रे सादर करण्यास काही कालावधी दिला आहे.