मराठवाडय़ाच्या हक्काच्या पाण्याच्या विषयासह सर्व प्रश्न विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात जोरकसपणे मांडले जावेत, या साठी मराठवाडा जनता विकास परिषदेच्या माध्यमातून विभागातील आमदारांची बैठक सोमवारी (दि. २५) आयोजित केली आहे.
पावसाळी अधिवेशनापूर्वी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत औरंगाबादला अशा स्वरूपाची बैठक झाली होती.
सोमवारीही सकाळी ११ वाजता चव्हाण यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत जायकवाडी पाण्यासंदर्भात घडामोडी, तसेच नगर-नाशिक जिल्ह्य़ांचे राजकारण या बाबत चर्चा करण्यात येणार आहे. मजविपचे अध्यक्ष डॉ. व्यंकटेश काब्दे यांनी बैठकीसंदर्भात सांगितले की, बैठकीला विभागातील जास्तीत जास्त आमदारांनी उपस्थित राहावे, या साठी प्रत्येकाशी संपर्क साधून आहोत. सरकार व जलसंपदा विभागाच्या चलाखीमुळे जायकवाडीच्या पाणीप्रश्नात गुंतागुंत वाढत चालली आहे. नगर-नाशिकच्या मंडळींनी हा विषय न्यायालयात नेऊन मराठवाडय़ाची कोंडी करण्याचा प्रयत्न चालविला आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींसह सर्व विकासप्रेमी नागरिक-संघटनांना येत्या काळात संघटित होऊन मराठवाडय़ावर अन्यायाचे हे षड्यंत्र हाणून पाडावे लागणार आहे.
गेल्या अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्र्यांनी विभागातील आमदार, मजविप पदाधिकाऱ्यांना आमंत्रित करून बैठक घेतली. पण बैठकीत दिलेली आश्वासने पाळली नाहीत, असा आरोप डॉ. काब्दे यांनी केला. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण कायद्यांतर्गत पाणीवाटपासंबंधी केलेल्या नियमातील दोषांवर मजविपने बोट ठेवत, त्यात आवश्यक त्या दुरुस्त्या सुचविल्या. पण त्याबाबत टोलवाटोलवी सुरू असून मुख्यमंत्री हतबल दिसत आहेत.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण गेल्या महिन्यात नांदेडला आले असता त्यांचे या बाबत लक्ष वेधून जायकवाडी धरणात हक्काचे पाणी सोडले पाहिजे, असा आग्रह धरला होता. पण निळवंडे धरणातून सोडलेल्या पाण्यापैकी किती पाणी जायकवाडीत पोचले, हे पाहिले असता आमची कशी थट्टा केली जात आहे, हेच सिद्ध होते. १३२ दलघमीपैकी फक्त १५ दलघमी पाणी आले. उर्वरित पाणी नगरनेच पळविल्याचे समोर आले. ही बाब आमदारांनी गांभीर्याने घ्यावी, अशी अपेक्षा आहे.
या पाश्र्वभूमीवर नागपूर हिवाळी अधिवेशनात मराठवाडय़ाचा आवाज बुलंद होण्याची गरज आहे, असे नमूद करून सोमवारच्या बैठकीला विभागातील जास्तीत जास्त आमदारांनी उपस्थित राहण्याचे आवाहन काब्दे यांनी केले. आमदारांसोबत खासदार व मराठवाडय़ातील सर्व मंत्र्यांनाही आमंत्रित करण्यात आले आहे.