उत्तर नगर जिल्ह्यातील मुळा, प्रवरा नद्या वाहत्या झाल्या आहेत. गोदावरी नदीला पूर आला आहे. अशा परिस्थितीत श्रीरामपूर विभागातील आपत्ती व्यवस्थापन झोपलेलेच दिसत आहेत. महसूल विभागाने माणसे वाचविण्यासाठी कुणालाही प्रशिक्षण दिलेले नाही. त्यासाठी असलेली एक होडी मात्र तहसील कार्यालयाच्या आवारात पडून आहे.
गोदावरी नदीत नाशिक जिल्ह्यातून मोठय़ा प्रमाणात पाणी सोडण्यात आले आहे. आज सुमारे २६ हजार क्युसेक्सने पाणी गोदावरी नदीतून वाहत आहे. मुळा धरणाचा साठा १९ टीएमसी कायम ठेवून २ हजार क्युसेक्सने पाणी मुळा नदीत सोडण्यात आले आहे. भंडारदरा व निळवंडे धरण भरले असून प्रवरा नदीपात्रात सुमारे अडीच हजार क्युसेक्स पाणी वाहणार आहे. हे सर्व पाणी जायकवाडी धरणात जाणार आहे.
पावसाचा जोर कायम असल्याने नदीपात्रातील पाण्याच्या पातळीत सातत्याने वाढ होत आहे. या पाण्यामुळे आजुबाजूच्या नागरिकांना धोका पोहचू शकतो. त्यासाठी शासनाने आपत्ती व्यवस्थापनाची निर्मिती केली आहे. श्रीरामपूर विभागात फक्त कार्यालयात आपत्तीव्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात आले. प्रत्यक्षात माणसे पुराच्या पाण्यात अडकली तर त्यांना कसे वाचवायचे याबाबत प्रशिक्षण देण्यात आलेले नाही.
श्रीरामपूरसाठी आपत्ती व्यवस्थापन समितीची जबाबदारी तहसीलदार किशोर कदम यांची असून त्यांनी पूर परिस्थिती आली तर कोणती उपाययोजना करावी यासंदर्भात कुठलीही कार्यवाही केलेली नाही. जिल्हा व्यवस्थापनाकडे हे काम असते असे सांगून त्यांनी आपल्यावरची जबाबदारी झटकली.