भीषण तसेच भयावह दुर्घटना झाल्याशिवाय काही करायचेच नाही या महाराष्ट्र शासनाच्या प्रवृत्तीचा प्रत्यय पुन्हा आला आहे, असा टोला लगावितानाच मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांनी आता तरी माळशेज घाट चौपदरीकरण प्रकल्प मार्गी लागेल, अशी अपेक्षा बुधवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. येत्या महिन्यापासून हे काम सुरू होईल, असेही त्यांनी सांगितले.
कसारा घाटाच्या नवीन रचनेप्रमाणे डोंगर वळणातील सपाट रस्त्यावर माळशेज घाटात बोगदे, उड्डाण पूल बांधण्याची योजना आहे. महाराष्ट्र शासनाने या प्रस्तावाला दोन वर्षांपूर्वी मंजुरी दिली आहे. घाटातील बहुतांशी जमीन वन विभागाची आहे. त्यामुळे केंद्रीय वन तसेच पर्यावरण विभागाने मान्यता दिल्यानंतरच या घाटात काम करता येईल, असे कथोरे यांनी स्पष्ट केले. भीषण अपघातांचा विचार करता हा प्रस्ताव लवकर मंजूर करून घेण्याच्या शासनाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत, असे ते म्हणाले. दहा किलोमीटरच्या माळेशज घाट रस्त्यात रस्ते दुभाजक नाहीत. अस्तित्वात असलेले संरक्षक कठडेच कमकुवत आहेत, असे शासनाच्या निदर्शनास आले आहे. या भागात काँक्रीटचे भक्कम संरक्षक कठडे बांधण्यात येणार आहेत, असेही कथोरे यांनी स्पष्ट केले. काँक्रीटचे कठडे असते तर गेल्या आठवडय़ातील बस दुर्घटना टाळता आली असती, असेही ते म्हणाले.
घाटातील प्रवास अधिक सुरक्षित  
कल्याण ते माळशेज घाट पायथ्यापर्यंत रस्ता चौदरीकरणासाठी भूसंपादनाचे काम सुरू झाले आहे. माळशेज घाट पायथ्याशी असलेल्या वैशाखरे गावापर्यंत जागा मिळण्यात फारशी अडचण येणार नाही. घाटात रस्ता रुंदीकरणासाठी पहिल्या टप्प्यात बोगदा खोदावा लागणार असून त्यासाठी ५० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. अर्थात केंद्रीय पर्यावरण खात्याच्या मंजुरीनंतरच हे काम मार्गी लागणार आहे. मात्र कठडे काँक्रीटीकरण आणि धोकादायक डोंगर कठडय़ांवर जाळ्या टाकण्याचे काम झाले की घाटातील प्रवास अधिक सुरक्षित होईल, असा विश्वासही कथोरे यांनी व्यक्त केला.