गेल्या दोन वर्षांत कल्याण, टिटवाळा, मलंग, नेवाळी रस्ता भागात स्वस्त दरात घरे देतो सांगून माफिया विकासकांकडून सामान्य नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक करण्याच्या घटना वाढत आहेत. आतापर्यंत १६ भूमाफिया विकासकांनी अशा प्रकारे नागरिकांना लाखो रुपयांचा गंडा घातला आहे. या घटना ताज्या असताना आता कल्याणमधील बैलबाजारातील साई लीला बिल्डर्स आणि डेव्हलपर्सने २० जणांना २० लाखांहून अधिक रकमेला घरे देण्याच्या आमिषाने फसवले असल्याचे उघड झाले आहे.
महात्मा फुले पोलीस ठाण्यात याप्रकरणी साई लीला बिल्डर्सचे स्वस्त घर योजनेचे प्रवर्तक जितेश भोईर, सुनील गावकर यांच्याविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. डोंबिवलीतील भाविक ठक्कर हा तरुण या प्रकरणात फिर्यादी आहे. मार्च महिन्यात नेवाळी, बदलापूर पाइपलाइन भागात दोन ते अडीच लाखांत बैठे घर देतो असे सांगून जितेश, सुनीलने जाहिराती करून नागरिकांकडून घरांसाठी धनादेश, रोखीतून पैसे जमा केले. २० जणांनी या योजनेत पैसे गुंतवले. २० लाख ६३ हजारांचा गल्ला जमा झाल्यानंतर या विकासकांनी कल्याणमधील बैलबाजार भागातील देसाई शॉपिंग कॉम्प्लेक्समधील आलिशान कार्यालय बंद करून पळ काढला. कार्यालय सतत बंद असल्याचा व विकासकांचे भ्रमणध्वनी बंद असल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर २० गुंतवणूकदारांनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
यापूर्वी एव्हरेस्ट, ओम साई, गजानन, आकृती, स्वस्तिक, उमंग, ग्रीन सिटी, साई एकवीरा, पांडू, सुख सागर, साई कृष्ण, आमंत्रण या कथित विकासकांनी नागरिकांना स्वस्त घराचे आमिष दाखवून पलायन केले आहे. कल्याण, डोंबिवलीतील पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल आहेत.