साने गुरूजी लिखीत ‘श्यामची आई’ या पुस्तकाचे येथील हुतात्मा स्मारकात आयोजित कार्यक्रमात आदिवासी वसतीगृहातील विद्यार्थिनींना विनामूल्य वाटप करण्यात आले.
औरंगाबाद येथे अखिल भारतीय साने गुरूजी कथामालेच्या ४८ व्या अधिवेशनानिमित्त येथील ज्येष्ठ उद्योजक विक्रम सारडा यांनी श्यामची आई या पुस्तकाच्या १० हजार प्रती विनामूल्य छापून दिल्या. या कार्यक्रमास सारडा हेही उपस्थित होते. अखिल भारतीय साने गुरूजी कथामालेचे अध्यक्ष जे. यु. ठाकरे, स्वातंत्र्यसैनिक वसंत हुदलीकर, रामभाऊ गायटे आदी उपस्थित होते. या प्रसंगी ठाकरे यांनी पुस्तकाची किंमत बाजारात २५० रुपये असली तरी साने गुरूजींचे विचार घराघरांमध्ये व आजच्या पिढीपर्यंत पोहचविण्याच्या हेतूने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी १० रुपये आणि शहरी भागात २० रुपये अशा सवलतीच्या दरात पुस्तक उपलब्ध करून देण्यात येईल, असे नमूद केले. इतरांसाठी १०० रूपयांस ते मिळू शकेल, असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रविण भामरे यांनी केले.