शहर परिसरात डेंग्युचा प्रार्दुभाव वाढत असताना आणि या आजाराने दोन जणांचा मृत्यू झाल्याच्या पाश्र्वभूमीवर, डेंग्युच्या रुग्णांसाठी मोफत रक्तपिशवी व औषधे उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे आरोग्य विभागाने मान्य केले आहे. या आजारावर नियंत्रण आणण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात कोरडा दिवस पाळणे, शहरात धूराळणी व फरावणीचे काम युध्द पातळीवर सुरू करावे, अशी सूचना आ. देवयानी फरांदे यांनी केली आहे. त्या अनुषंगाने यंत्रणांनी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

जिल्ह्यात डेंग्युने भयावह स्थिती निर्माण झाली असून चोवीस तासात दोन जणांचा या आजाराने मृत्यू झाला. या पाश्र्वभूमीवर, आ. फरांदे यांनी तातडीने आरोग्य व पालिका यंत्रणांची संयुक्त बैठक जिल्हा रुग्णालयात बोलावली. यावेळी आरोग्य उपसंचालक डॉ. बी. डी. पवार, आरोग्य अधिकारी डॉ. सुनील वाकचौरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एकनाथ माले, पालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. सुनील बुकाणे आदी उपस्थित होते. डेंग्युच्या रुग्णांची संख्या वाढत असताना प्लेटलेट्स व रक्तपिशव्यांची कृत्रिम टंचाई निर्माण करून जादा दराने त्यांची विक्री केली जात आहे. यात रुग्ण व नातेवाईक आर्थिकदृष्टय़ा भरडले जात असल्याच्या तक्रारी आहेत. हा मुद्दा उपस्थित झाल्यावर आरोग्य उपसंचालकांनी डेंग्युच्या रुग्णांना मोफत रक्तपिशवी व औषधे उपलब्ध करण्याची तयारी दर्शविली. ज्या रुग्णांना त्याची आवश्यकता आहे, त्यांनी आरोग्य विभागाकडून ते प्राप्त करावीत, असे आवाहन प्रा. फरांदे यांनी केले. डेंग्यु नियंत्रणात आणण्यासाठी त्यांनी तीन गोष्टींवर प्राधान्याने लक्ष देण्याची सूचना केली. डासांचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात कोरडा दिवस पाळण्याची गरज आहे. नागरीक घराघरात पाणी साठवून ठेवतात. टाकीमध्ये पाणी साठविले जाते. कोरडा दिवस पाळल्यास डासांना प्रतिबंध घालणे सूकर होईल. या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाशी चर्चा करून कोरडय़ा दिवसाची निश्चिती केली जाणार आहे. डासांचे निर्दालन करण्यासाठी धूराळणी व फरावणीचे काम युध्दपातळीवर करण्याची गरज आहे. त्यादृष्टीने पालिकेची यंत्रणा कुचकामी आहे. पालिकेकडे स्वत:ची केवळ चार यंत्र असून त्यांची क्षमता अतिशय सीमित आहे. शहराचा विस्तार लक्षात घेता खासगी तत्वावर हे काम केले जात होते. मुदतवाढ न दिल्यामुळे धूर फवारणीचे काम अनेक दिवस बंद होते. मुळात, फवारणी व धूराळणी वेळेवर झाल्यास डास अळी अवस्थेत असताना नष्ट करता येऊ शकतात, याकडे फरांदे यांनी लक्ष वेधले.
महापालिकेही उपरोक्त यंत्रणा काही दिवस बंद होती. डेंग्युने भयग्रस्त स्थिती निर्माण झाली असताना युध्दपातळीवर धूराळणी व फरावणी होणे आवश्यक आहे. पालिकेच्या प्रभारी आयुक्तांनी या संदर्भात तातडीने कार्यवाही करावी, अशी सूचना करण्यात आली आहे.

आरोग्य अधिकारी संपर्कहिन
डेंग्युच्या सावटामुळे सर्वसामान्य धास्तावले असताना आरोग्य विभागातील अधिकारी, महापालिका आरोग्य विभागाचे अधिकारी भ्रमणध्वनीवरही उपलब्ध होत नव्हते. जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, महापालिकेचे आरोग्य अधिकारी या सर्वांचे भ्रमणध्वनी संपर्क क्षेत्राच्या बाहेर असल्याचे निदर्शनास आले. बैठकीच्या नावाखाली काही आरोग्य अधिकाऱ्यांनी तर दिवसभर भ्रमणध्वनी उचलणे टाळले.