राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत रुग्णांसाठी विविध योजना राबविण्यासोबत आरोग्य सेवाही पुरविण्यात येत आहे. या उपक्रमाचा भाग म्हणून शासनाने राज्यातील जिल्हा रुग्णालये, महिला रुग्णालये, सामान्य रुग्णालये व विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयांमधून हिमोफेलिया, थॅलेसिमिया व सिकलसेल रुग्णांसाठी रक्तातील घटक (फॅक्टर) पुरवठा करण्यासाठी नऊ कोटीहून अधिकचा निधी मंजूर केला आहे. त्यातील ३४ लाख २६ हजार रुपयांचा निधी नाशिक विभागाला मिळाला आहे. उत्तर महाराष्ट्रातील सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये आता ही सुविधा उपलब्ध होईल.
राज्यातील जिल्हा रुग्णालय तसेच इतर ठिकाणी उपचारादरम्यान हिमोफेलिया, थॅलेसिमिया तसेच सिकलसेलचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी रक्तातील ‘फॅक्टर’ पुरविण्याची आवश्यकता असते. खासगी दवाखान्यातील खर्चीक उपचार बहुतेकांच्या आवाक्याबाहेर असतो. त्यामुळे या अभियानाच्या सहकार्याने नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात २०१३-१४ मध्ये हिमॅटोलॉजी विभाग कार्यान्वित करण्यात आला. त्यासाठी कंत्राटी तत्त्वावर वैद्यकीय अधीक्षक, प्रयोगशाळातज्ज्ञ, समुपदेशक, परिचारिका आणि प्रकल्प समन्वयकाची नेमणूक करण्यात आली. दरम्यान, नाशिकसह सातारा, अमरावती ठाणे येथेही संबंधित सेवा प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली. तसेच मुंबई येथील केईएम रुग्णालय व पुणे येथील बीजे वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयांमार्फत रक्तातील फॅक्टर पुरविण्यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला. या प्रस्तावाची सार्वजनिक आरोग्य विभागाने दखल घेत राज्यातील जिल्हा रुग्णालय, ठाणे, नाशिक, सातारा व अमरावती रुग्णालयांमार्फत संबंधित रुग्णांना रक्तातील फॅक्टरचा पुरवठा तसेच आवश्यक गोळ्या पुरविण्यासाठी नऊ कोटी दहा लाख ४४ हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. नाशिक विभागासाठी ३४ लाख २६ हजार रुपयांच्या निधीचा समावेश आहे.
दरम्यान, गतवर्षांत नाशिक विभागाने संबंधित आजारांविषयी जनजागृती करणे, रुग्णांचा आशा व सामाजिक संस्थाच्या माध्यमातून शोध, त्यांच्यावर आवश्यक वैद्यकीय उपचार तसेच रुग्ण मानसिकदृष्टय़ा सक्षम असावा, यासाठी समुपदेशनाच्या माध्यमातून काम सुरू ठेवले. वर्षभरात हिमोफिलियाचे २७० रुग्ण तसेच थायलेसिमीया व सिकलसेलचे २५० रुग्णांवर
औषधोपचार करण्यात विभागाला यश आले. नुकत्याच मंजूर झालेल्या निधीतून अत्याधुनिक यंत्रणा, काही यंत्रणेची देखभाल दुरुस्ती, कर्मचाऱ्यांचे मानधन, प्रयोगशाळेत
बदल, मुबलक प्रमाणात औषधसाठा उपलब्ध करून देण्यासाठी करण्यात येईल असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रवींद्र शिंगे यांनी सांगितले.