15 August 2020

News Flash

लोकसभेत खा. गांधींनी वेधले लक्ष

खासदार दिलीप गांधी यांनी रेल्वे अंदाजपत्रकावरील त्यांच्या भाषणात संसदेमध्ये नगरच्या रेल्वे विषयक प्रश्नांवर आवाज उठवला व वारंवार मागणी करूनही रेल्वे मंत्रालय नगरकडे दुर्लक्ष करत असल्याविषयी

| March 13, 2013 09:00 am

खासदार दिलीप गांधी यांनी रेल्वे अंदाजपत्रकावरील त्यांच्या भाषणात संसदेमध्ये नगरच्या रेल्वे विषयक प्रश्नांवर आवाज उठवला व वारंवार मागणी करूनही रेल्वे मंत्रालय नगरकडे दुर्लक्ष करत असल्याविषयी खंत व्यक्त करत अंदाजपत्रकावर टीका केली. भिंगार छावणी मंडळातील अंतर्गत रस्त्यांबाबतही त्यांनी लोकसभेच्या शून्य  प्रहरात विचारणा केली.
रेल्वे अंदाजपत्रकावर बोलण्यासाठी गांधी यांना वेळ देण्यात आला होता. नगर-मनमाड रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण सर्वेक्षणासाठी अंदाजपत्रकात फक्त २५ हजार रूपये ठेवून नगरची चेष्टाच केली असल्याची टीका गांधी यांनी केली. नगर-बीड-परळी रेल्वे मार्गाचे काम फक्त १२ किलोमीटर झाले आहे. पुढच्या कामासाठी १०८ करोड रुपयांची गरज आहे. मात्र काहीही पैसे उपलब्ध करून दिले जात नाहीत असे गांधी यांनी निदर्शनास आणले व हा मार्ग कधी अस्तित्वात येणार अशी विचारणा केली.
पुणे-नगर रेल्वेमार्गाने जोडण्याचा विषयही गांधी यांनी उपस्थित केला. मागील वर्षीच्या अंदाजपत्रकात या मार्गाच्या सर्वेक्षणासाठी तरतूद करू असे सांगण्यात आले होते. त्याचा मागमूसही अंदाजपत्रकात दिसत नाही असे गांधी यांनी सांगितले. शिर्डी-मुंबई गाडीला जादा डबे जोडणे, कल्याण-नगर रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण पुर्ण करणे, सोलापूर-नगर-मनमाड-नाशिक अशी नवी गाडी सुरू करणे, नगर रेल्वे स्थानकात आरक्षण खिडकी वाढवणे व वाहनतळाची सुविधा करणे असे काही विषयही गांधी यांनी आपल्या भाषणात उपस्थित केले व हे अंदाजपत्रक निराशाजनक असल्याची टिका केली.
लोकसभा कामकाजाच्या शून्य प्रहरात त्यांनी भिंगार छावणी मंडळ कार्यक्षेत्रातील रस्ता दुरूस्तीबाबत विचारणा केली. सन १९०५ मधील हा रस्ता दुरूस्त करण्याची अत्यंत गरज आहे, मात्र भिंगार छावणी मंडळ त्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र देत नाही व स्वत:ही रस्त्याचे काम करत नाही असे त्यांनी निदर्शनास आणले व याची दखल घेऊन ना हरकत प्रमाणपत्र देण्याबाबत छावणी मंडळाला सूचना करावी अशी मागणी केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 13, 2013 9:00 am

Web Title: gandhi turns attention in parliament
टॅग Parliament,Railway
Next Stories
1 फ लटण व खंडाळा तालुक्यातील ९३ गावात टंचाई परिस्थिती जाहीर
2 ‘यशवंतराव चव्हाणांना जाणून घेण्याची अमेरिकेतही ओढ’
3 यशवंतरावांमुळेच प्रत्येक गावात शिक्षणाची सोय – निंबाळकर
Just Now!
X