कोणी तरी म्हटले आहे, ‘शब्द येतात ना आतून तेव्हा एक थरार असतो, अशासाठी जगणे म्हणजे आयुष्याशी केलेला करार असतो..’ हा अलिखित करार मोडून काही मंडळी केवळ खाणाखुणांच्या माध्यमातून एकमेकांशी संवाद साधतात. ‘मूक-बधिर’ अशी त्यांची ओळख असली तरी त्यांच्या राज्यात ते राजे असतात. येथील अशाच काही मंडळींनी बाप्पांचा उत्सव साजरा करण्यासाठी एकत्रित येत श्री गणेशोत्सव मूक-बधिर मित्र मंडळाची मुहूर्तमेढ रोवली. मंडळाचा सध्या देखाव्यांवर भर असला तरी पुढील काळात सामाजिक उपक्रम राबविण्याचे नियोजन केले आहे.
नाशिक येथील मखमलाबाद रस्त्यावर वास्तव्यास असणारे सुशांत गालफाडे मूक-बधिर आहेत. लहानपणापासून त्यांना बाप्पाचे आकर्षण होते. सार्वजनिक गणेशोत्सवात आपण सहभागी व्हावे, त्यांच्यातील एक होऊन काम करावे असे त्यांच्या मनात होते. मात्र त्यांच्या व्यंगाचा कधी उपहास तर कधी दया दाखविण्यात आली. आपण वेगळे आहोत या भावनेपेक्षा त्यांच्यातील एक नाही, ही खंत त्यांना सतावत होती. या अस्वस्थतेतून गालफाडे यांनी त्यांच्यासारख्या ४० हून अधिक मंडळींना एकत्र आणत २०१३ मध्ये श्री गणेशोत्सव मूक-बधिर मित्र मंडळाची स्थापना केली. मंडळाचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत. मंडळाचा कारभारही त्यांच्याच घरातून चालतो.
गणेशोत्सवासाठी मंडळाने स्वत: काही पैसे गोळा केले. देणगीदारांच्या इच्छेनुसार जी काही वर्गणी मिळेल ती गोळा केली. महापालिकेच्या बी. डी. भालेकर मैदानावर मंडळाने पहिल्या वर्षी पुण्याच्या दगडुशेठ हलवाई गणपतीचा देखावा साकारला. मंडप उभारणीपासून, बांधणी, सजावट, मूर्ती आणणे, आरतीसह अन्य सर्व कामांत कार्यकत्यांनी स्वत:ला झोकून दिले. गणेशोत्सवाचा आपण एक भाग झालो आहोत, ही भावना त्यांना सुखावणारी ठरली. या आनंददायी शिदोरीतून मंडळाने यंदा दीड महिना आधीपासून कामास सुरुवात केली. कामाचे नियोजन करण्याची त्यांची पद्धत अफलातून आहे. लघुसंदेशाद्वारे परस्परांमध्ये भ्रमणध्वनीवर निरोपाची देवाण-घेवाण केली जाते. बैठकांच्या तारखा निश्चित होतात. कोणी काय काम करायचे त्याचे नियोजन होते. मंडळातील बहुतांश सदस्य छोटे व्यावसायिक आहेत. गॅरेज, इलेक्ट्रिकल असे काहींचे व्यवसाय असून उर्वरित मंडळी सातपूर व अंबड औद्योगिक वसाहतीत कामगार म्हणून काम करतात. यंदाही आकर्षक सजावट व विद्युत रोषणाई कार्यकर्त्यांनी स्वत: केली आहे.
गालफाडे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाच्या अध्यक्षपदाची धुरा सारंग कुलकर्णी, उपाध्यक्ष बिस्मिला शाह, सचिव शंतनू पंडित, खजिनदारपद श्रीकांत छत्रे हे सांभाळत आहेत. गणेशभक्तांशी संवाद साधता यावा यासाठी सल्लागार म्हणून सौरभ छत्रे व अविनाश आहेर यांची नियुक्ती केली आहे. सध्या मंडळाने सजावटीवर भर दिला असला तरी नजीकच्या काळात सामाजिक उपक्रम राबविण्याचा मानस आहे. गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, वृक्षारोपण, रक्तदान शिबीर यासारखे छोटेखानी कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे गालफाडे यांनी सांगितले.