महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ व राज्य कर्मचारी महासंघाने प्रलंबित मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी नागपूर अधिवेशनावर मोर्चाव्दारे धडक देण्याची घोषणा राजपत्रित अधिकारी महासंघाचे उपाध्यक्ष विनायक लहाडे यांनी येथे केली.
स्थानिक बचत भवनात आयोजित पत्रकार परिषदेत विनायक लहाडे यांनी राज्य सरकारचे राजपत्रित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने आता विधान भवनावर धडक देणार असल्याची माहिती दिली.    यावेळी राज्य कर्मचारी संघटनेचे नेते रवींद्र देशमुख, राजपत्रित नेते रवींद्र देशमुख, राजपत्रित महासंघाचे डॉ.संदीप इंगळे, राज्य संघटक अशोक मोहिते, श्यामसुंदर देव, नरेंद्र फुलझेले, भागवत डोईफोडे, राजेश आडपवार, नंदू बुटे आदि मान्यवर यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी लक्षवेधी आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर ९ ऑक्टोबरला दोन तासाचे कामकाज बहिष्कार आंदोलन करण्यात आले. मात्र, तरीही मुख्यमंत्री अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मागण्या समजून घेण्यासाठी वेळ देत नाही व त्यासाठी बठकही बोलवित नाही, याबाबत लहाडे यांनी संताप व्यक्त केला.
शासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्यामुळे आता १६ डिसेंबरला नागपूर अधिवेशनावर मोर्चा काढण्यात येणार आहे. मात्र, तत्पूर्वी मुख्यमंत्र्यांनी चच्रेसाठी आमंत्रित केल्यास मोर्चाच्या निर्णयाबाबत महासंघ फेरविचार करेल, असेही यावेळी सांगण्यात आले.
सर्व रिक्त पदे भरणे, अधिकारी व कर्मचाऱ्यांवर हल्ले व दमबाजी करणाऱ्यांविरुध्द कठोर कायदा करणे, बदल्यांचा अधिकाऱ्यांच्या विकेंद्रीकरण करणे, केंद्राप्रमाणे निवृत्तीचे वय साठ करणे, पाच दिवसांचा आठवडा करणे, महिला कर्मचाऱ्यांसाठी बालसंगोपन रजा, सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना, सर्व संवर्गांना लागू करणे, केंद्राच्या दराप्रमाणे वाहतूक, शिक्षक व होस्टेल भत्ता देणे, ग्रॅच्युईटीबाबत केंद्राप्रमाणे निर्णय घेणे, यासह विविध मागण्या या मोर्चाव्दारे सरकारपुढे मांडण्यात येणार आहेत, असे लहाडे यांनी सांगितले.