tv17 १९६३ मध्ये श्रीकृष्ण ऊर्फ अण्णा व्यवहारे मुंबईतील दादर येथील  जागा सोडून ठाण्यात राहायला आले. त्यावेळी आता अगदी मध्यवर्ती ठिकाण असलेले घंटाळी देवीचे मंदिर तसे गावाबाहेर होते. नवरात्रीनिमित्त देवळात नऊ दिवस भाविकांचा राबता असायचा. मात्र इतर वेळी शुकशुकाटच होता. पुढच्याच वर्षी स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊन अण्णांनी उत्सवाला शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या आवाहनाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे २६ जानेवारी १९६४ रोजी  घंटाळी मित्र मंडळाची स्थापना करून अण्णांनी त्याला संस्थात्मक रूप दिले. सवंग प्रसिद्धीच्या मागे न लागता सार्वजनिक उत्सवांच्या माध्यमातून समाज प्रबोधन साधण्याचा घेतला वसा हे मित्रमंडळ गेली ५० वर्षे कसोशीने पाळत आले आहे. त्यामुळे घंटाळी म्हटले की शिस्त हे जणू काही समीकरणच बनले आहे.
१९७१ पासून घंटाळी मित्र मंडळाचा योग विभाग सुरू झाला आणि पुढील काळात योग प्रशिक्षण ही या संस्थेची प्रमुख ओळख बनली. दिवंगत योगाचार्य का. बा. सहस्रबुद्धे यांच्या प्रेरणेतून सुरू झालेल्या या योग प्रसार कार्याचा आता महावृक्ष बनला आहे. कोणतेही शुल्क न घेता मानवाच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यास लाभदायक ठरणारी ही साधना मंडळातर्फे शिकवली जाते हे विशेष. योग प्रसाराचे हे कार्य आता ठाण्यापुरते मर्यादित राहिलेले नाही. पुणे आणि मुंबईतही घंटाळी मित्र मंडळाचे योग वर्ग भरतात. गेल्या चार दशकांच्या कालावधीत मंडळाच्या योग शाखेने २०० योग प्रशिक्षक तयार केले आहेत. त्यात २५ डॉक्टर्स आहेत. ते विनामूल्य योगाचा प्रसार करीत आहेत.   
सध्याच्या काळात ताणतणावाचे व्यवस्थापन (स्ट्रेस मॅनेजमेंट) हा परवलीचा शब्द झाला आहे. मात्र दैनंदिन जीवनातील ताणांना योग साधनेद्वारे कसे तोंड द्यावे याचे प्रशिक्षण घंटाळी मित्र मंडळाचे स्वयंसेवक गेली चार दशके देत आले आहेत. पश्चिम रेल्वेत ३५ वर्षे नोकरी करून अण्णा व्यवहारे निवृत्त झाले. योग प्रसाराचे त्यांचे कार्य मात्र अजूनही सुरू आहे. गेली सलग तीस वर्षे मंडळाच्या घंटाळी येथील कार्यालयात ते सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी सात ते आठ यावेळेत योगापचाराचे सल्ले देत आहेत.
tv16गेल्या चार दशकांत मंडळाच्या वतीने उंची वृद्धी, स्मृती संवर्धन, अस्थमा नियंत्रण, रक्तदाब नियंत्रण, ज्येष्ठ नागरिकांसाठी सुलभ योग, स्थूलता निर्मूलन आदी विविध प्रकारची योग शिबिरे घेण्यात आली. इतकेच काय कारागृहातील बंदिवान, अपंग, डॉक्टर्स, खेळाडू, मतिमंद, तसेच आदिवासी मुला-मुलींसाठीही खास योग वर्ग घेण्यात आले आहेत. लाखो नागरिकांनी या शिबिरांच्या माध्यमातून योगाची दीक्षा घेतली आहे. अजूनही हे उपक्रम सुरू आहेत.
या व्यतिरिक्त १९७८ पासून मंडळाच्या वतीने निरनिराळ्या ठिकाणी योग जागृती संमेलने भरविण्यात आली आहेत. योगाचा अधिक प्रसार व्हावा या हेतूने मंडळाने वेळोवेळी रंजक आणि मनोरंजक कार्यक्रमही सादर केले. त्यात ‘रोग मनाचा-शोध मनाचा’, नादब्रह्म, प्रेरणा, भक्तिगंगा, रंग चैतन्याचे, माय मराठी, ब्रह्मसाधना आणि उजळला प्रकाशु आदी कार्यक्रमांचा समावेश आहे.   
याव्यतिरिक्त मंडळाचा स्वतंत्र प्रकाशन विभाग आहे. त्याद्वारे आनंद योग (लेखक-श्रीकृष्ण व्यवहारे), सायन्स ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड योग (श्रीधर जोशी), पातंजल योग-सूत्रे व अर्थ (स्वामी आनंदऋषी), शुद्धिप्रक्रिया (लता महाजन), रक्तदाब आणि योग (श्रीधर जोशी), मेधा संस्कार (श्रीकृष्ण व्यवहारे) वेदमाता गायत्री (डॉ. शांताराम आपटे) आदी पुस्तके प्रकाशीत आहेत. सुवर्ण महोत्सवानिमित्त सध्या १७ ते २३ जानेवारी दरम्यान सहयोग मंदिर येथे संस्थेतर्फे योग सप्ताह सुरू आहे.

नवरात्रीतले नवरंग
आधुनिक युगात योगाचे महत्त्व अधोरेखित करण्यात घंटाळी मित्रमंडळाचे मोठे योगदान आहे. मात्र त्याचबरोबर विविध सांस्कृतिक उपक्रमांमध्येही या संस्थेचा सहभाग असतो. महाराष्ट्रात ठिकठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सवात सांस्कृतिक आणि मनोरंजनपर कार्यक्रम आयोजित केले जातात. मात्र नवरात्रोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमांचे नवरंग सादर करणारी घंटाळी ही एकमेव संस्था असावी. घंटाळी देवीच्या मंदिरात देवीचा जागर सुरू असतानाच त्यालगतच्या मैदानात व्यावसायिक/हौशी नाटके, पडद्यावरचे चित्रपट, जादूचे प्रयोग, व्याख्याने, गाण्यांच्या मैफली आदी कार्यक्रम होत. नंतरच्या काळात सहयोग मंदिर सभागृहात हे कार्यक्रम आयोजित केले जात होते. टी.व्ही.चे प्रस्थ वाढल्यानंतर हळूहळू मंडळाच्या सांस्कृतिक कार्यक्रमांना मिळणारा प्रतिसाद कमी होऊ लागला. त्यामुळे गेल्या वर्षी नवरात्रोत्सवातील सांस्कृतिक कार्यक्रमांना पूर्णविराम देत असल्याचे मंडळाने जाहीर केले. अर्थात काळानुरूप नागरिकांची अभिरुची बदलली असली तरी ठाण्याला महाराष्ट्राच्या सांस्कृतिक उपराजधानीचा दर्जा मिळवून देण्यात घंटाळी मित्रमंडळाचे महत्त्वाचे योगदान आहे. किंबहुना ठाणे शहर म्हटल्यावर ज्या तीन-चार गोष्टी ठळकपणे समोर येतात, त्यातील एक घंटाळी मित्रमंडळ आहे.        
प्रशांत मोरे